Vande Metro Tendernama
पुणे

Pune: पुणेकरांसाठी Good News! मुंबई-पुणे मार्गावर लवकरच धावणार 'वंदे मेट्रो'?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसनंतर (Vande Bharat Express) पुणेकरांना आता ‘वंदे मेट्रो’ची (Vande Metro) प्रतीक्षा आहे. दोन शहरांदरम्यान इंटरसिटीच्या धर्तीवर ‘वंदे मेट्रो’ धावणार आहे.

देशात सध्या एकच ‘वंदे मेट्रो’ धावत आहे. येत्या काही महिन्यांत पाच वंदे मेट्रो विविध प्रमुख शहरांत धावणार आहेत. याच पार्श्‍वभूमीवर मध्य रेल्वेला एक ‘वंदे मेट्रो’चा रेक मिळणार आहे. हा रेक मुंबई-पुणेदरम्यान धावण्याची शक्यता असल्याने पुणेकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

भूज ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या पहिल्या ‘वंदे मेट्रो’चे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या रेल्वेला एकूण १६ डबे जोडलेले आहेत. ही रेल्वे पूर्णपणे अनारक्षित असल्याने आरक्षित तिकिटाची आवश्यकता नाही.

‘वंदे भारत’प्रमाणे दिसणारी व त्याप्रमाणे सुविधा असणाऱ्या रेल्वेतून सामान्य प्रवाशांनाही प्रवास करता येणार आहे. ही संपूर्ण वातानुकूलित रेल्वे असून अनारक्षित असल्याने हिचे तिकीट दरदेखील कमी राहतील. त्यामुळे सामान्य प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. या रेल्वेची निर्मिती सामान्य प्रवाशांना डोळ्यासमोर ठेवून केली आहे.

उत्पादन संथगतीने

‘वंदे मेट्रो’च्या उत्पादनास वेळ लागणार आहे. यासाठीची टेंडर प्रक्रियादेखील अद्याप पूर्ण झालेली नाही. देशातील पाच ते सहा मोठ्या कंपन्यांनी ‘वंदे मेट्रो’च्या निर्मितीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे काही दिवसांतच टेंडर प्रक्रियेला सुरुवात होईल. त्यानंतर प्रत्यक्षात ‘वंदे मेट्रो’च्या डब्याचे व इंजिनचे उत्पादन सुरू आहे.

मार्च २०२५पर्यंत इंटिग्रल कोच फॅक्टरीसह (आयसीएफ) देशातील अन्य रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये वंदे मेट्रोचे उत्पादन होणार नाही. एप्रिल २०२५नंतर उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.

‘वंदे मेट्रो’ची वैशिष्ट्ये

- प्रवासी क्षमता : ३२०० हून अधिक

- वेग : ताशी १३० किलोमीटर प्रति तास

- आजारी व्यक्तीसाठी स्ट्रेचरची व्यवस्था

- संपूर्ण वातानुकूलित

- अनारक्षित डबे

मध्य रेल्वेला वंदे मेट्रोचा एक रेक मिळणार आहे. तो कधीपर्यंत मिळेल, हे आता सांगता येणार नाही. शिवाय कोणत्या मार्गावर धावेल याचीही स्पष्टता नाही.

- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई