Pune City Tendernama
पुणे

Pune : पुणेकरांसाठी Good News! 'या' मार्गांवर होणार मेट्रोचा विस्तार

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेने (PMC) स्थायी समिती तसेच सर्वसाधारण सभेत मंजूर झालेला विस्तारित मार्गांचा आराखडा महामेट्रोला (Mahametro) सादर केला. मेट्रोच्या वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, खडकवासला ते खराडी, पौड फाटा ते माणिकबाग या मेट्रोच्या ४४.८ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दोन्ही प्रस्ताव महामेट्रोकडे सादर करण्यात आले. राज्य सरकार व केंद्र सरकारची मान्यता घेण्यासाठी महामेट्रोकडून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. शहरातील मेट्रोचे जाळ विस्तारण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार महामेट्रोने वरील मार्गांचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार केला. २०२२ मध्ये हे डीपीआर महापालिकेला सादर करण्यात आले. महापालिकेने विविध नऊ विभागांचे अभिप्राय घेतले. त्यामध्ये आवश्‍यक सूचना व त्यानंतर बदल करून आलेले प्रस्ताव स्थायी समितीने चार ऑगस्टला मंजूर केला. १४ ऑगस्टला मुख्य सभेनेही त्यास मान्यता दिली.

मेट्रो कायद्यात सुधारणा करण्यात आल्याने महापालिकेवर आर्थिक भार पडणार नाही, अशी तरतूद करून कर्जाच्या माध्यमातून निधी उभारता येईल. महापालिकेला केवळ भूसंपादनासाठी आवश्‍यक असलेली रक्कम द्यावी लागणार आहे. या दोन्ही मार्गांसाठी १२ हजार ६८३ कोटी रुपये खर्च येणार आहे.

खर्च वळता करणार
महामेट्रोतर्फे काम करताना पावसाळी गटार, सांडपाणी वाहिनी, पदपथ, रस्ते खराब झाले आहेत. याची दुरुस्ती महामेट्रोने करणे अपेक्षित आहे. पण महापालिकेने ‘जी२०’ व पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर ही कामे करून घेतली आहेत. महापालिकेला महामेट्रोचे १५० कोटी रुपये देणे आहे. हा खर्च महापालिका वळता करून घेईल. उर्वरित रक्कम महामेट्रोला दिली जाईल, असे विक्रमकुमार यांनी सांगितले.

असा आहे मेट्रो मार्ग

वनाज ते चांदणी चौक - १.२ किमी
रामवाडी ते वाघोली - ११.६३ किमी
खर्च - ३६०९ कोटी


खडकवासला ते खराडी - २५.८६ किमी
पौड फाटा ते माणिकबाग - ६.११ किमी
खर्च - ९०७४ कोटी

मेट्रोच्या विस्तारित मार्गांना महापालिकेने मान्यता दिल्यानंतर हे प्रस्ताव महामेट्रोला सादर केले. त्यामुळे मेट्रोकडून पुढील मान्यता घेण्यासाठी कार्यवाही सुरू होईल.

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका