Pune Airport Tendernama
पुणे

Pune : पुणेकरांसाठी गुड न्यूज! आता थेट बँकॉक, दुबईसाठी...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे विमानतळावरून (Pune Airport) बँकॉक आणि दुबईसाठी सेवा सुरू झाली. दुबईहून पुण्यासाठी आणि पुण्याहून बँकॉकसाठी शुक्रवारी (ता. २२) उड्डाण झाले. या दोन नव्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमुळे पुण्याहून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढली आहे.

पूर्वी पुण्याहून दोन आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होत्या. त्यात आणखी दोन सेवांची वाढ झाली. मात्र विमानतळ प्रशासन व इमिग्रेशनचा वाद न मिटल्याने सर्वच आंतरराष्ट्रीय उड्डाणे जुन्याच टर्मिनलवरून होतील. नवीन टर्मिनल आंतरराष्ट्रीय विमानांच्या प्रवाशांना अजूनही दूरच आहे.

पुणे विमानतळावरून हिवाळी हंगामात बँकॉक व दुबईसाठी विमानसेवा सुरू झाली. ही सेवा इंडिगो कंपनीने सुरू केली असून दुबईसाठी दैनंदिन, तर बँकॉकसाठी आठवड्यातून तीन दिवस असेल. सध्या पुण्याहून सिंगापूर व दुबईसाठी विमानसेवा सुरू आहे. त्यात आता दोन नव्या सेवांची भर पडली आहे.

...अशी आहे वेळ


१. पुणे-बँकॉक : दर बुधवार, शुक्रवार व रविवार. पुण्याहून रात्री ११.१० मिनिटांनी उड्डाण. बँकॉकला पहाटे ४.४५ मिनिटांनी पोहोचेल.


२. बँकॉक-पुणे : दर सोमवार, गुरुवार व शनिवार. बँकॉकहून मध्यरात्री १.१५ मिनिटांनी उड्डाण, पुण्याला पहाटे ४.१५ मिनिटांनी पोहोचेल.

३. पुणे-दुबई : दैनंदिन : रात्री १२.१५ मिनिटांनी उड्डाण, दुबईला २.१५ मिनिटांनी पोहोचेल.

४. दुबई-पुणे : दैनंदिन : सायंकाळी ५.४० मिनिटांनी उड्डाण व पुण्याला रात्री १०.१० मिनिटांनी पोहोचेल.

वादामुळे प्रवासी जुन्या टर्मिनलमध्ये...
इमिग्रेशन व भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्यात गेल्या पाच महिन्यांपासून वाद सुरू आहे. इमिग्रेशन विभागाने सुरवातीला स्वतंत्र डेस्कसह मोठ्या मोकळ्या जागेची मागणी विमानतळ प्रशासनाकडे केली होती. ती मागणी प्रशासनाने मान्य केली. त्यानंतर पुन्हा नवीन टर्मिनलवर पुरुष व स्त्रियांसाठी स्वतंत्र विश्रामकक्षाची, तसेच आणखी काही मागणी केली.

त्या मागणीवर प्रशासनाने आक्षेप नोंदविला. परिणामी जुन्या टर्मिनलहून नवीन टर्मिनलवर स्थलांतर करण्यास इमिग्रेशन विभागाने नकार दिला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे अजूनही जुन्याच टर्मिनलमधून सुरू आहेत.

डिजियात्राचा प्रवास रखडलेला...
नवीन टर्मिनल कार्यान्वित होऊन पाच महिने झाले. अद्याप ‘डिजियात्रा’ची सुविधा सुरू झालेली नाही. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (बिकास) नवीन टर्मिनलवर डिजियात्रेच्या चारही गेटची पाहणी केली.

मुंबईतील पथकाने पाहणी केली असून त्याचा अहवाल दिल्लीतील मुख्यालयाला सादर केला. मात्र त्याला दिल्लीतील ‘बिकास’च्या मुख्यालयाची मंजुरी मिळालेली नाही. परिणामी नवीन टर्मिनलवर ‘डिजियात्रा’ची सुविधा सुरू झालेली नाही.

नवीन टर्मिनलवरून दररोज सुमारे ६० विमानांचे उड्डाण होत आहे. दररोज १२० विमानांची वाहतूक नवीन टर्मिनलवरून होत आहे. प्रवाशांकडे डिजियात्राचे ॲप असूनदेखील त्यांना सेवा सुरू न झाल्याने लाभ घेता येत नाही. प्रवाशांना चेक इन काउंटरवर रांगेत थांबावे लागत आहे. यात प्रवाशांचा वेळ वाया जात आहे.

नवीन टर्मिनलवर इमिग्रेशन व डिजियात्रा सुविधा सुरू होण्याकरिता पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्यांना मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी मिळाल्यानंतर त्या सुविधांचा लाभ प्रवाशांना घेता येईल. आंतरराष्ट्रीय उड्डाण जुन्या टर्मिनलमधून सुरू आहे.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे