Sand Tendernama
पुणे

Pune: पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी गुड न्यूज; वाळू खरेदीसाठी...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : वाळू (Sand) उपसा करण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाने २६ ठिकाणे निश्चित केली आहेत. त्याकरिता ई-टेंडर (E-Tender) मागविल्या असून टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणांहून ६०० रुपये ब्रास या सरकारी दराने नागरिकांना वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे.

राज्य सरकारने नवीन वाळू धोरण आणले आहे. नागरिकांना स्वस्त दराने वाळू मिळण्यासाठी तसेच अनधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जलसंपदा विभागाकडून जिल्ह्यात वाळू उपसा करण्याच्या ठिकाणांची माहिती मागविली होती.

त्यांनी दिलेल्या माहितीवरून प्रशासनाने जिल्ह्यातील दौंड, हवेली, बारामती, जुन्नर, पुरंदर, आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यातून जाणाऱ्या भीमा, मुळा-मुठा, नीरा, घोड, कऱ्हा, मीना नदीपात्रातून गाळमिश्रित वाळू उपसा आणि आगार करण्याची ठिकाण निश्चित करण्यात आली आहेत.

दरम्यान, बारामती तालुक्यात नीरा नदीवर मुरूम, वाणेवाडी येथे वाळू उपसा करण्याचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. जुन्नरमधील मीना नदीवरील निरगुडे आणि बेलसर, पुरंदर तालुक्यातील कऱ्हा नदीवर कुंभारवळण, एखतपूर, खानवडी, नाझरे सुपे, नाझरे क.प., जवळार्जुन आणि पांडेश्वर येथे वाळू आगार केले जाणार आहे.

आंबेगाव तालुक्यातील घोड नदीवर देवगाव, लाखणगाव, काठापूर बु., पारगाव तर्फे अवसरी बु. चिचोडी, तर भीमा नदीवरील मांडगाव फराटा आणि सादलगाव, खेडमधील भीमा नदीवर पाडळी येथे वाळू उपसा आणि आगार केले जाणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील २६ वाळू आगार निश्चित करण्यात आले आहेत. त्याकरिता ई-टेंडर प्रसिद्ध करण्यात आली आहे. टेंडर खरेदी, अनामत रक्कम भरणे यासाठी १८ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १९ जुलै रोजी दुपारी दोन वाजता टेंडर उघडल्या जाणार आहेत.

- सुयोग जगताप, जिल्हा खनिकर्म अधिकारी