पुणे (Pune) : गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वृक्षतोड केली जाणार असल्याने त्याविरोधात पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर वृक्षतोडीवर स्थगिती देऊन अभ्यासासाठी समिती गठित करण्यात आली होती. या समितीने दिलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारत महापालिकेने एकही झाड न तोडता ७१ झाडांचे पुनर्रोपण करावे, असे आदेश देत स्थगिती उठवली आहे. त्यामुळे रुंदीकरणाच्या कामाला गती येणार आहे.
गणेशखिंड रस्त्यावर ‘पीएमआरडीए’तर्फे मेट्रो आणि उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याठिकाणी महापालिकेने विकास आराखड्यात दर्शविल्याप्रमाणे ३६ ऐवजी ४५ मीटरचा रस्ता केला जाणार आहे. दोन्ही बाजूंनी साडेचार मीटरचा रस्ता रुंद होणार असताना त्यामध्ये सुमारे १६४ झाडे तोडली जाणार होती.
महापालिकेने यापैकी ९३ झाडे काढून टाकली. पण ही कार्यवाही करताना महापालिकेने नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात उर्वरित ७१ झाडे काढली जाऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली होती.
यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर या ठिकाणचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करून त्यांना यासंदर्भात दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
दिल्ली ‘सीआरआरआय’चे डॉ. एस. वेलमुरूगन, मुंबई ‘आयआयटी’चे (नगर नियोजन) डॉ. हिमांशू बुरटे, मुंबई ‘आयआयटी’चे (पर्यावरण) डॉ. श्याम असोलेकर, नागपूर ‘नीरी’च्या शालिनी ध्यानी या चार सदस्यीय समितीने दोन ऑनलाइन बैठकांमध्ये गणेशखिंड रस्त्यासंदर्भात महापालिका व याचिकाकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी फेब्रुवारी महिन्यात गणेशखिंड रस्त्यावर प्रत्यक्ष जागा पाहणी करून मुदतीमध्ये याप्रकरणातील अहवाल न्यायालयात सादर केला होता. त्यावर नुकतीच सुनावणी होऊन न्यायालयाने यासंदर्भातील निकाल दिला.
गणेशखिंड रस्त्यावरील ७१ पैकी १९ झाडे पूर्णपणे काढली जाणार आहेत. तर ५२ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. त्याऐवजी सर्व ७१ झाडांचे पुनर्रोपण करावे, शहरात ५ हजार वृक्षारोपण करावे असे न्यायालयाने गठित केलेल्या समितीने अहवालात नमूद केले होते. न्यायालयाने हा अहवाल आज स्वीकारून त्यानुसार महापालिकेला कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. ॲड. अभिजित कुलकर्णी यांनी न्यायालयात महापालिकेतर्फे बाजू मांडली.
उच्च न्यायालयाने समितीचा अहवाल स्वीकारला असून, त्यामध्ये ७१ झाडांचे जिओ टॅगिंग करून पुनर्रोपण करावे, ५ हजार झाडे लावावीत असे आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही पूर्ण करून गणेशखिंड रस्त्याचे लवकरच रुंदीकरण केले जाईल. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल.
- अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख
उच्च न्यायालयाने गणेशखिंड रस्त्यावरील झाडांचे पुनर्रोपण करण्यास सांगून येथील कामावरची स्थगिती उठवली आहे.
- निशा चव्हाण, विधी सल्लागार