SPPU Ganeshkhind Road Tendernama
पुणे

Pune : अखेर गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणातील 'तो' अडथळा दूर

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरत असलेल्या ‘नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर’कडून (एनआयसी) रस्ता रुंदीकरण करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानुसार, पुणे महापालिका प्रशासनाकडून तेथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासह आणखी १३० मीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम शिल्लक असून, एक महिन्यात संबंधित काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

गणेशखिंड रस्त्यावर बहुमजली उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू आहे. त्याचबरोबर महापालिका प्रशासनाकडून रस्ता रुंदीकरणाचेही काम केले जात आहे. धोत्रे रस्त्यापासून ते सेनापती बापट रस्ता जंक्‍शनपर्यंतचे रुंदीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (आचार्य आनंदऋषी महाराज चौक) ते शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्यावरील काही ठिकाणांवरील रुंदीकरणाचे काम अद्याप झालेले नाही.

‘एबीआयएल’च्या पाठीमागील बाजूस असलेल्या ठिकाणी पावसाळी वाहिनी, जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र जलवाहिनी नवीन वाहिनीला जोडण्याचे काम शिल्लक आहे. तसेच एनएच ढाब्याजवळील वीज वाहिन्या स्थलांतरित करण्याचे काम अद्याप बाकी आहे. ही दोन्ही कामे पाणीपुरवठा विभाग, महावितरण विभाग अशा वेगवेगळ्या विभागांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने १३० मीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम शिल्लक असून ते एक महिन्यात पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर महापालिकेस विद्यापीठाजवळील ‘एनआयसी’ या संस्थेकडून रुंदीकरणासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर महापालिकेने तेथे तत्काळ काम सुरू केले आहे. त्यामुळे रुंदीकरणातील मोठा अडथळा दूर झाला आहे. मात्र रिझर्व्ह बॅंकेच्या कृषी बॅंकींग महाविद्यालयाकडून महापालिकेस अद्याप रस्ता रुंदीकरणासाठी परवानगी मिळालेली नाही. काही तांत्रिक कारणामुळे हे काम राहिले असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गणेशखिंड रस्त्यावरील काही ठिकाणचे रुंदीकरणाचे काम बाकी आहे. तांत्रिक अडचणी दूर करून हे काम एक महिन्यात पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- मनोज गाठे, उपअभियंता, पथविभाग, पुणे महापालिका