agriculture college pune Tendernama
पुणे

Pune : अखेर ठरलं! 'त्या' प्रकल्पासाठी मिळणार बॉटनिकल गार्डनची जागा

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांतर्गतच्या (STP) कृषी महाविद्यालयातील ‘एसटीपी’ केंद्रासाठी बॉटनिकल गार्डनची जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाची तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. संबंधित जागा महापालिकेला (PMC) मिळण्यासाठी आवश्‍यक सुधारित मागणीचा प्रस्ताव राज्य जैवविविधता मंडळामार्फत राज्य सरकारकडे पाठविण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

शहरातील मैलापाणी व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून शहराच्या वेगवेगळ्या भागांत मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली जात आहेत. खराडी, भैरोबानाला, नायडू रुग्णालय, वारजे व वडगाव या ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे आहेत. तर गणेशखिंड रस्त्यावरील कृषी महाविद्यालयांतर्गत असणाऱ्या बॉटनिकल गार्डन येथे महापालिकेचे पंपिंग स्टेशन अस्तित्वात आहे.

तेथील जागा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प व जोड रस्ता करण्यासाठी विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित होती. मात्र, संबंधित ठिकाण हे राज्य सरकारच्या वन विभागाने जैवविविधता वारसा क्षेत्र जाहीर केल्याने तेथे केंद्र उभारण्यास महापालिकेस तांत्रिक अडचण येत होती.

दरम्यान, केंद्र सरकारच्या पथकानेही त्या प्रकल्पाची काही महिन्यांपूर्वी पाहणी करून बॉटनिकल गार्डन येथील अडचण सोडविण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या पार्श्‍वभूमीवर वन विभागाच्या मुंबई येथील प्रधान सचिवांच्या कार्यालयामध्ये संबंधित जागेच्या समस्येबाबत डिसेंबर महिन्यात बैठक झाली. या बैठकीसाठी प्रधान मुख्य वन संरक्षक, राज्य जैवविविधता मंडळाचे सचिव, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक, महापालिकेचे आयुक्त, मुख्य अभियंता, उपवनसंरक्षक व राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक, अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.

या बैठकीमध्ये घोषित केलेल्या जैवविविधता वारसा क्षेत्रामधून मैलापाणी शुद्धीकरण केंद्र व जोड रस्ते यांचे क्षेत्र वगळण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यानंतर आवश्‍यकता असल्यास शुद्धीकरण केंद्र प्रस्तावित असलेल्या क्षेत्राची वन विभाग व विद्यापीठाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पाहणी करावी, त्यानंतर वारसा क्षेत्राच्या अधिसूचनेत आवश्‍यक सुधारणा करण्याचा परिपूर्ण प्रस्ताव महापालिकेने राज्य जैवविविधता मंडळामार्फत सादर करण्याचे आदेश महसूल व वन विभागातर्फे दिले आहेत. त्यामुळे मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला आणखी गती येण्याची चिन्हे आहेत.

मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी आवश्‍यक जागेसंबंधी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यांच्या सूचनेनुसार जागेची पाहणी केली असून, लवकरच जागा मागणीसाठीचा सुधारित प्रस्ताव महापालिकेकडून राज्य जैवविविधता मंडळामार्फत केला जाईल.

- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, महापालिका