Pune City Tendernama
पुणे

Pune : PMP च्या 'या' निर्णयामुळे पुणेकरांचा प्रवास होणार Superfast

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मेट्रोच्या (Pune Metro) गतिमान प्रवासानंतर आता ‘पीएमपी’चे (PMPML) प्रवासी देखील ‘सुपरफास्ट’ सेवेचा अनुभव घेत आहे. मात्र ही सेवा मर्यादित मार्गांवर आहे. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन ‘पीएमपी’ प्रशासन आणखी २०० मार्गांवर ‘विना थांबा, विना वाहक’ बस सेवा सुरू करीत आहे. त्या दृष्टीने मार्गांचे सर्वेक्षण देखील झाले आहे. काही दिवसांत या मार्गांवर ‘सुपरफास्ट’ सेवेचा अनुभव मिळणार आहे.

प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून ‘पीएमपी’ने शहरांतील निवडक चार मार्गांवर विनावाहक व विनाथांबा बससेवा सुरू केली आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘सुपरफास्ट’ सेवेमुळे प्रवाशांच्या वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होणार असल्याने जलद बससेवेचा विस्तार करण्याचे ठरविले आहे. त्यानुसारच २०० मार्गांच्या सर्वेक्षणाला सुरवात झाली आहे.

प्रवाशांना आपल्या कार्यालयात अथवा इच्छित स्थळी जलद पोचावे अशी इच्छा असते. मात्र, मार्गातील सिग्नल, वाहतूक कोंडी व थांब्यावर थांबणाऱ्या बसमुळे जलद प्रवासाच्या इच्छेला ‘ब्रेक’ लागतो. प्रवाशांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘पीएमपी’चे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी विनाथांबा व विनावाहक बस सेवा सुरू केली आहे.

दृष्टिक्षेपात...

- सध्या चार मार्गांवर ‘विना वाहक, विना थांबा’ बससेवा

- २०० मार्ग निवडण्याचे काम सुरू

- वाहतूक विभागाने आतापर्यंत २० मार्ग निवडले

- बस सुटण्यापूर्वीच चालक प्रवाशांना तिकीट देणार

- वातानुकूलित बसचा वापर

- तिकीट दरात कोणतेही वाढ नाही

विनावाहक व विनाथांबा सेवेस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे सेवेचा विस्तार करीत आहोत. जलद सेवेमुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होईल. एक महिन्याच्या आत सेवेचा विस्तार होईल.

- सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे