पुणे (Pune) : विकास आराखडा रखडल्याने महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या ३४ गावांचे वीज, कचरा, पाणी, रस्ते, ड्रेनेज आदी मूलभूत सुविधांअभावी बकालीकरण झाले आहे. दुसरीकडे महापालिका भरमसाट कर गोळा करत आहे.
विकास आराखडा तातडीने मंजूर करून पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर शहराच्या सभोवतालच्या ३४ गावांतील विकास कामे राबविण्यात यावी, अन्यथा जन आक्रोश आंदोलन सत्याग्रह करण्याचा निर्धार सर्वपक्षीय हवेली तालुका नागरी कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी सांगितले. कृती समितीची धायरीत नुकतीच बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले, ‘‘विकास आराखडा नसल्याने कामांचे योग्य नियोजन नाही. रस्ते, ड्रेनेज, पाणी आदी समस्या गंभीर झाल्याने लाखो नागरिकांना दररोज जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ओबडधोबड कामे करून ठेकेदार व अधिकारी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा मलिदा खात आहेत.निकृष्ट कामामुळे पाणी मिळत नाही. रस्ते अपुरे पडत आहेत. वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यामुळे तातडीने विकास आराखडा मंजूर करण्यात यावा.’’