पुणे (Pune) : शहराच्या वेगवेगळ्या भागात सातत्याने होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेकडून (PMC) अपघातप्रवण क्षेत्रांवर (ब्लॅक स्पॉट) तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित ठिकाणांवरील अपघात काही प्रमाणात कमी झाले आहेत. काही ब्लॅक स्पॉटवर दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र आर्थिक तरतूद व तांत्रिक कारणांमुळे त्यासाठी विलंब होत असल्याची सद्यःस्थिती आहे.
शहराच्या वेगवेगळ्या भागांत दररोज अपघात होऊन नागरिक गंभीर जखमी होत आहेत. काही जणांना आपला जीव गमवावा लागतो. शहरातील अपघातांच्या घटना कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीन महिन्यांपूर्वी बैठक झाली होती. शहराच्या वेगवेगळ्या भागात ३४ ब्लॅक स्पॉट असून, तेथे सातत्याने अपघात होत आहेत. त्यापैकी ११ ब्लॅक स्पॉट एनएचएआयअंतर्गत महामार्गावर आहेत, तर उर्वरित २३ ब्लॅक स्पॉट महापालिकेच्या हद्दीत येतात. त्यामुळे संबंधित २३ ब्लॅक स्पॉटवर महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तेथे उपाययोजना करण्याबाबत संबंधित बैठकीत ठरले होते.
दीर्घकालीन उपाययोजना हव्यात
संबंधित ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी तात्पुरत्या व दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेच्या पथ विभागाने आत्तापर्यंत २३ ब्लॅक स्पॉटवर तात्पुरत्या स्वरूपात पांढरे पट्टे, रस्त्यांची दुरुस्ती, दिशादर्शक व सूचना फलक, पथदिवे, क्रॅश बॅरिअर पेंटिंग, लेन मार्किंग, रिफ्लेक्टर, सिग्नल यंत्रणा बसविणे, राडारोडा काढणे, अनधिकृत पोचमार्ग बंद करणे यासारख्या उपाययोजना तातडीने केल्या आहेत. त्यामुळे अपघात कमी होऊ लागल्याची सद्यःस्थिती आहे.
मात्र अनेक ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी आराखडा तयार करून चौक सुधारणा करणे, दुभाजक तयार करणे, रस्ता रुंदीकरण करणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी चेंबर तयार करणे यासारखी दीर्घकालीन कामे होणे आवश्यक आहे. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे दीर्घकालीन कामांना विलंब होत आहे.
आर्थिक तरतूद केव्हा?
आर्थिक तरतुदीच्या अभावामुळे दीर्घकालीन उपाययोजना करण्यास मर्यादा येत आहेत. आर्थिक तरतूद झाल्यास संबंधित कामे काही महिन्यांतच पूर्ण होऊ शकतात. महापालिकेच्या पथ विभागाकडून दीर्घकालीन उपाययोजनांच्या कामांसाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीसाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर विविध कामांच्या टेंडर काढण्याचीदेखील तयारी सुरू केली आहे.
हे आहेत २३ ब्लॅक स्पॉट
वैदुवाडी चौक, माई मंगेशकर रुग्णालय चौक, कात्रज चौक, विमाननगर चौक, खराडी दर्गा चौक, खराडी बाह्यवळण चौक, रिलायन्स मार्ट, खराडी, रामवाडी जकात नाका, टाटा गार्ड रूम, हेमंत करकरे चौक, काउन्सिल हॉल चौक, मुंढवा चौक, बी. टी. कवडे रस्ता, खडी मशिन चौक, थिटे वस्ती पेट्रोल पंप, साईनाथ नगर चौक, पठाणशाह दर्गा चौक, संचेती चौक, सादलबाबा दर्गा, मुंढवा, ५०९ चौक.
ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. २३ ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना तत्काळ केल्या आहेत. तांत्रिक व आर्थिक तरतुदीच्या अभावामुळे दीर्घकालीन कामे काही प्रमाणात विलंब होत आहे.
- साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग, महापालिका
महापालिका व पोलिस प्रशासनाने एकत्रित ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत. अन्यथा अपघातांच्या घटना थांबणार नाहीत. उपाययोजना केल्यास नागरिकांचे प्राण वाचतील.
- विजय माने, नागरिक