पुणे

Pune : शहरातील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासातील अडचणी वाढल्या; 'हे' आहे कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : गावठाणांच्या हद्दीत पंधरा मीटरपेक्षा जास्त उंचीचे बांधकाम करताना एक मीटर साइड मार्जिन (सामासिक अंतर) न सोडलेल्या इमारतींना दंडात (हार्डशिप) सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने (PMC) घेतला. परंतु त्यासाठी १८ मीटर लांबीची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासात आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

नगरपालिका आणि महापालिकांमध्ये बांधकाम नियमावली समान असावी म्हणून राज्य सरकारने २०२० मध्ये ‘यूडीसीपीआर’ नियमावली लागू केली. त्यात गावठाणासाठी एक मीटर सामासिक अंतर सोडण्याचा नियम आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास रेडी-रेकनरमधील दराच्या ३५ टक्के दराने दंड आकारून भोगवटापत्र देण्याचीही अट घालण्यात आली. त्यामुळे पुणे शहरातील गावठाणांच्या हद्दीतील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग बंद झाला.

दरम्यान, हा नियम आल्यानंतर महापालिकेकडून गावठाणांच्या हद्दीत सामासिक अंतर न सोडता जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाला परवानगी देण्यात आली. ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित बांधकामांना भोगवटापत्र देण्यास महापालिकेनेच हरकत घेतली. त्यामुळे परवानगी मिळूनही भोगवटापत्र मिळत नाही हे लक्षात आल्याने दंडात सवलत मिळावी, अशी मागणी संबंधित व्यावसायिकांकडून होत होती. त्याची दखल घेत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले. दंडाच्या रकमेत सवलत द्यावी, अशी विनंती त्यांनी केली.

फडणवीस यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र देऊन अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होते. आयुक्तांनी परिपत्रक काढून निवासी बांधकामांना एकूण बांधकामावर दहा टक्के, तर वाणिज्य बांधकामांना एकूण बांधकामाच्या १५ टक्के दंड आकारण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याची अंमलबजावणी करताना १८ मीटर लांबी असलेल्या बांधकामांना (वाड्यांना) ही सवलत द्यावी अशी अट घातली. यामुळे अनेक बांधकामे अडचणीत आली आहेत.

गावठाणच्या हद्दीत रुंदी कमी आणि साठ ते शंभर मीटर लांबी असलेल्या जुन्या वाड्यांची संख्या जास्त आहे. अशा वाड्यांच्या पुनर्विकासात अडचणी येत आहेत. त्यामुळे १८ मीटर लांबीची अट काढावी अशी मागणी बांधकाम क्षेत्रातून होत आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेतल्यानंतर १८ मीटर लांबीच्या अटीसाठी अग्निशमन दलाने आग्रह धरल्याचे समजले.

बांधकाम खात्यातील वातावरण गरम

गावठाणांच्या हद्दीत बांधकाम व्यवसाय करणारे काही माजी नगरसेवकही आहेत. तेही या अटीमुळे अडचणीत आले आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी एका माजी नगरसेवकाने पुढाकार घेत आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारद यांची बैठक बोलविली होती. मार्ग काढायचा असेल तर बैठकीला उपस्थित राहावे, असा ‘मेसेज' बांधकाम व्यावसायिकांना पाठविण्यात आले. बैठकीत त्यावर चर्चा झाल्याचे समजते. बैठकीवरून महापालिका वर्तुळात चर्चा सुरू झाल्याने बांधकाम खात्यातील वातावरण गरम झाले आहे.