Stamp Tendernama
पुणे

Pune : सातबारा उताऱ्यावरील नोंदीसाठी होणारा विलंब कमी होणार; कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : दस्तनोंदणी वेळी खरेदीदार आणि विक्रीदार यांनी स्वत:चे अचूक मोबाईल क्रमांक संगणक प्रणालीमध्ये नमूद करावे, असे आवाहन भूमि अभिलेख विभागाने केले आहे. त्यामुळे खरेदीदाराला दस्त झाल्यानंतर फेरफार व सातबारा उताऱ्यावरील नोंदीची सद्यःस्थिती मोबाईलवर समजण्यास मदत होणार आहे.

जमिनीला सोन्याची किंमत आल्यामुळे व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रकार देखील वाढले आहेत. बोगस व्यक्तीला उभे करून जमिनीचे दस्त केल्याचे अनेक प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहे. त्याचबरोबर सातबारा उताऱ्यावर बोजा चढविणे, परस्पर गहाण खत करणे आदी फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले, असे प्रकार टाळण्यासाठी जमीन खरेदी-विक्रीचा दस्त नोंदणी करताना खरेदीदार व विक्री करणारे यांचे अचूक मोबाईल नंबर संगणक प्रणालीमध्ये नमूद करण्याचा निर्णय भूमि अभिलेख विभागाने घेतला आहे.

नोंदणी विभागाद्वारे ‘आय सरिता’ प्रणालीमार्फत करण्यात येणारी दस्त नोंदणी ई फेरफार आणि ई प्रॉपर्टी कार्ड प्रणालींशी संलग्न करण्यात आलेली आहे. नोंदणी झालेला दस्त संगणक प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे फेरफार घेण्याकरिता पाठविण्यात येतो. जमीन खरेदी करणारे आणि विक्री करणारे यांचे अचूक मोबाईल नंबर या प्रणालीमध्ये नोंदविले, तर ई फेरफार प्रणालीमधील फेरफारची प्रक्रिया सुकर व पारदर्शक होते.

यामुळे दस्तनोंदणी वेळी खरेदीदार व विक्री करणारे यांचे मोबाईल नंबर संगणक प्रणालीमध्ये नोंदविण्याचे आवाहन जमाबंदी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. याबाबतचे पत्र भूमि अभिलेख विभागाने जारी केले आहे.

दस्त नोंदणी करण्यापूर्वी दस्तांची माहिती pdeigr.maharashtra.gov.in वर भरावी लागते. ही माहिती भरताना खरेदीदार व विक्री करणारे आणि इतर संबंधित यांचे मोबाईल नंबर, ईमेल व पत्ते अचूक देण्यात यावे, असे आवाहनही जमाबंदी आयुक्तांनी केले आहे.

दस्त नोंदणी झाल्यानंतर तो दस्त ऑनलाइन तलाठी कार्यालयाकडे जातो. त्यानंतर सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यापूर्वी तलाठी खातेदारांना नोटीस बजावतात. ही नोटीस पोस्टाद्वारे पाठविण्यात येत असल्याने नागरिकांना ती मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर खरेदीदाराच्या नावाची नोंद घेण्यास उशीर होतो.

एखादा व्यक्ती बाहेरच्या जिल्ह्यात अथवा परदेशात राहत असल्यास त्या व्यक्तीला नोटीस वेळेत पोहचत नाही. या पार्श्‍वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता फेरफारची नोटीसची माहिती एसएमएसच्या आधारे मोबाईलवरच मिळणार असल्यामुळे नोंदीसाठी होणारा विलंब कमी होणार आहे.