पुणे (Pune) : येथील चाकण ते वासुली फाटा (ता. खेड) मार्गावरील बाह्यवळण रस्ता व पुलाचे काम जलदगतीने सुरू आहे. चाकण एमआयडीसीच्या (Chakan MIDC) वाहतुकीसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. या मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्यामुळे लवकरच चाकरमान्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
चाकण ते करंजविहिरे या मार्गाचे काम हायब्रीड अँन्युटीअंतर्गत केले होते. परंतु, आंबेठाण येथे बाह्यवळण रस्ता आणि पुलाचे काम बरेच दिवस रखडले होते. त्यापैकी जागेचा विषय मार्गी लागल्याने बाह्यवळण झाले. पण, पुलाचे काम रखडल्याने नागरिकांना पावसाळ्यात खड्ड्यांचा सामना करावा लागत होता.
सध्या काम सुरू असल्याने स्थानिक नागरिकांसह कामगार, एमआयडीसीत येणाऱ्या वाहनांना म्हाळुगे मार्गे-दवणे वस्ती येथून चाकणला जावे लागत आहे. तर काही वाहनधारक बोरदरा-गोनवडीवरून चाकणला जातात. काही वाहनधारक म्हाळुगे मार्गे जात असल्याने दररोज कोंडीला सामोरे जावे लागते. आठ ते दहा किलोमीटर अंतरासाठी कधीकधी दोन तास वेळ लागत आहे.
हे काम पूर्ण झाल्यावर चाकण तळेगाव रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. हे काम रात्रंदिवस हे काम सुरू आहे. परंतु, पोलिस बंदोबस्तात कामाला सुरुवात केल्याने अल्पावधीतच पुलाचे काम पूर्ण होणार आहे. भर पावसात कामगार काम करीत असल्याने नागरिकांकडून कामगार, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
रात्रंदिवस हे काम सुरू आहे. शनिवारपर्यंत वाहतूक सुरू होईल. यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत. नागरिकांना गैरसोय होत आहे, याची जाणीव आहे. अजून दोन दिवस सहकार्य करावे.
- संतोष पवार, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग