PMC Pune Tendernama
पुणे

Pune : भूमिपूजन न करता थेट स्मारकाच्या कामाला सुरवात; कारण काय?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : देशातील मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडेवाडा स्मारक उभारणीच्या कामाचे भूमिपूजन न करता थेट स्मारकाच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. सध्या माती तपासणीचे काम सुरू असून, गणेशोत्सवानंतर या कामाला वेग येणार आहे.

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८८५ मध्ये या जागेत मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी अनेक वर्षे आंदोलने करण्यात आली. या प्रकरणी जागा मालकांनी भूसंपादनाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. महापालिकेने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन ही जागा ताब्यात घेतली.

लोकसभा निवडणुकीपूर्वी या कामाचे भूमिपूजन केले जाणार होते. पण स्मारक कसे उभारले पाहिजे, त्यास ऐतिहासिक बांधकाम कसे करावे, याचा विचार केला गेला. त्यासाठी वास्तुविशारदाकडून अनेक आराखडे मागविण्यात आले. पण त्यावर एकमत होत नसल्याने निर्णयास विलंब झाला. अखेर एक आराखडा अंतिम करून टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. या स्मारकासाठी सुमारे सव्वासात कोटींचा खर्च केला जाणार आहे.

या स्मारकाच्या भूमिपूजनाचा मोठा कार्यक्रम घेतला जाणार होता. त्याला राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार होते. पण हे नियोजन रद्द करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर महापालिकेने गेल्या आठवड्यात भिडेवाडा स्मारकाचे काम सुरू केले आहे.

भवन विभागाचे प्रमुख युवराज देशमुख म्हणाले, ‘‘भिडेवाडा स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या माती परीक्षण आणि इतर कामे सुरू आहेत. गणेशोत्सवानंतर या कामाला वेग येईल.’’