पुणे (Pune) : पुण्यातील कात्रज चौक आणि वाहतूक कोंडी (Traffic Jam At Katraj Chowk) असे जणू समिकरणच बनले आहे. कात्रज चौकातील वाहतूक कोंडीच्या समस्येने आता गंभीर रुप धारण केले आहे. फक्त कात्रज चौकातच वाहतूक कोंडी होत नसून ती आता कोंढवा रस्त्यांवरील राजस चौक, सातारा रस्त्यांवर भारती विद्यापीठपासून गुजरवाडी फाटा, मुंबई महामार्गावर नवले पुलापर्यंत कायम असल्याचे दिसते आहे. ही कोंडी सोडविताना पोलिसांच्याही (Police) नाकीनऊ आले आहेत.
कात्रज चौकात अनेकदा पीएमपीएलच्या बसेसमुळेही वाहतूक कोंडीत भर पडते. चौकात होणाऱ्या कोंडीमुळे पीएमपीएमएल आगाराकडून येणाऱ्या बसेसना गुजरवाडी बस स्थानकावरून वळवून कात्रज बसथांब्यावर आणण्याचा आदेश आहे. मात्र, पीएमपीएमएल चालकांकडून त्याचे पालन होताना दिसत नाही. कात्रज चौकात रिक्षा, बसदेखील थांबत असतात त्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात या चौकात गर्दी करतात. त्याचबरोबर, उजवीकडे बसेस व अवजड वाहनांना वळण्यास बंदी असताना त्याचेही पालन होताना दिसत नाही.
परिणामी मोठ्या प्रमाणांवर वाहतूक कोंडी होते आणि दोनशे मीटर अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना अर्ध्या तासापेक्षा जास्त कालावधी मोजावा लागतो. कोंढवा रस्ता, सातारा रस्ता, नवले पूल आणि पुणे शहरातून एकाच वेळी येणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. यामध्ये सकाळी आणि संध्याकाळच्यावेळी अधिकची भर पडते. उत्तमनगर ते कात्रज चौक मार्गावर वाहतूक कोंडीची हीच परिस्थिती असते.
या मार्गावर अवजड वाहनांना बंदी असताना वाहतूक पोलिसांकडून सर्सास दुर्लक्ष होताना दिसत आहे. या मार्गावर सर्सास अवजड वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असते. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.