Tender Tendernama
पुणे

Pune Tender: 'या' ठेकेदाराचे टेंडर पालिकेने का केले रद्द?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : येरवडा (Yerawada) येथील पंचवटी चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सव्वातीन कोटी रुपये खर्च करून रस्ता रुंदीकरण व तारकेश्‍वर पुलाची भिंत वाढविण्याचे काम केले जाणार होते. पण हे काम करणाऱ्या ठेकेदाराने खोटी कागदपत्रे जोडल्याचे समोर आल्याने आता टेंडर (Tender) रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. तसेच या ठेकेदारावर (Contractor) कारवाई करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला आहे.

बंडगार्डन पुलालगत महापालिकेने तारकेश्वर पूल बांधला आहे. पंचवटी चौक ते कोरेगाव पार्क या भागाला हा पूल जोडतो. पंचवटी चौकात मेट्रोच्या खांबामुळे या चौकातील रस्त्याचा भाग कमी झाल्याने संगमवाडीकडून येणारी वाहने आणि नगर रस्त्यावरून येणारी वाहने एकमेकांसमोर येऊन कमी जागेमुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रकल्प विभागाने या चौकातील रस्ता मोठा करणे, पुलाच्या बाजूने असलेला खड्डा भरून तेथे भिंत बांधणे, त्या भागात नवा रस्ता तयार करणे या कामासाठी टेंडर काढले होते. पहिल्या वेळी केवळ एकच टेंडर आल्याने ते टेंडर रद्द करून फेरटेंडर काढण्यात आले. फेरटेंडरमध्ये कागदपत्रांची छाननी आणि सर्वात कमी रकमेचे टेंजर मान्य करण्यात आले, त्याच वेळी दुसऱ्या ठेकेदाराने ज्या ठेकेदाराला काम मिळाले आहे, त्याच्या कागदपत्रांबद्दल आक्षेप घेतला.

प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे पत्र व्यवहार करून या ठेकेदाराने सादर केलेल्या अनुभव प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी केली. तेथून मिळालेली कागदपत्रे आणि ठेकेदाराने दाखवलेला अनुभव यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली. महापालिकेने ठेकेदाराकडे यासंदर्भात चौकशी केली असता, त्यांनी अद्याप यावर कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे प्रकल्प विभागाने अतिरिक्त आयुक्तांकडे निवेदन सादर करून टेंडर रद्द करावे का, ठेकेदारावर कारवाई करावी, यासाठी पत्र सादर केले आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

सलग दुसरा प्रकार उघडकीस

प्रकल्प विभागात नुकतेच उड्डाण पूल व पूल रंगविण्याच्या टेंडरमध्ये एका ठेकेदाराने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावाची कागदपत्रे दाखल करून काम मिळण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर अद्याप कायदेशीर कारवाई झालेली नाही. त्यानंतर आता हा दुसरा प्रकार समोर आला. काम मिळविण्याच्या स्पर्धेतून खोटी कागदपत्रे दिली जात असल्याने व कामे रखडत असल्याने त्याचा फटका पुणेकरांना बसत आहे. त्यामुळे महापालिकेने अशा ठेकेदारांवर काळ्या यादीत टाकण्यासह फौजदारी स्वरूपाचा गुन्हे दाखल करणे आवश्‍यक आहे.

तारकेश्वर पुलाचे टेंडर रद्द करण्यासंदर्भात व ठेकेदारावर कारवाई करण्यासंदर्भातील प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही, हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर कागदपत्रांची छाननी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.

- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका