Pune Tendernama
पुणे

Pune : नागरिकांच्या संतापाचा कडेलोट; गावेच काढली विक्रीला! काय आहे कारण?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेमध्ये (PMC) नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांतर्गत कोणत्याही सुविधा महापालिका देत नाही. परंतु, कर मात्र भयंकर आकारत आहेत. लाखो रुपयांच्या करामुळे गावांमधील नागरिक त्रस्त झाले असल्याने, कर न भरल्यास जप्तीचे प्रसंग नागरिकांवर येत आहे. कर एवढा भरमसाट आहे की, सगळे घरदार विकले, तरी कर भरणे गावकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे ३२ गावांतील नागरिकांनी ‘गाव विकणे आहे’ हे निषेध आंदोलन सुरू केले.

‘गाव विकणे आहे’ मजकुराचे फलक सर्व गावागावात लावलेले आहे. महापालिकेचा जुलमी कर भरणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेने संपूर्ण गावच विकत घ्यावे. त्यांचे कर भरून द्यावे, अशा तीव्र भावना गावातील नागरिकांच्या आहेत. तसेच, जोपर्यंत कर कमी होत नाही आणि नव्याने लागू होत नाही, तोपर्यंत मतदान न करण्याचा तसेच, शहरातील विविध भागात आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ३२ गावांतील लोकांनी दिला.

आमची गावे ही महापालिकेत समाविष्ट असूनही आमचे खूप हाल होत आहेत. उत्पन्नापेक्षा कर जास्त आहे. तसेच, गावाचा कर हा सामान्यांसारखा वार्षिक असला पाहिजे, जो सध्याच्या स्थितीला मासिक आहे, असे अनेक प्रश्न राहुल पोकळे, श्रीरंग चव्हाण, रमेश कोंडे, काकासाहेब चव्हाण यांसह इतर मंडळीने पत्रकार परिषदेत मांडले.