cm shinde Tendernama
पुणे

Pune : मुख्यमंत्री साहेब, टोल देऊनही राज्यातील महामार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य कसे काय?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : राज्यातील बहुतांश महामार्गांवर ठिकठिकाणी खड्डे (Potholes) पडल्याने प्रवाशांची मोठ्याप्रमाणावर गैरसोय होत असून, त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

राज्याची राजधानी मुंबई आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याला जोडणाऱ्या जुन्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते; परंतु सध्या या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट कामाचा त्रास वाहनचालक आणि प्रवाशांना सोसावा लागत आहे. पावसामुळे तर येथील रस्त्याची अवस्था अधिक बिकट झाली आहे. विशेषतः कोळखे, डेरवली या गावाजवळच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

जेएनपीटी महामार्गाला जोडण्यासाठी कोळखे गावाजवळ एका उड्डाणपुलाची जोड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. त्यामुळे या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे; परंतु देखभाल-दुरुस्तीअभावी या रस्त्याचीही वाट लागली आहे.

तीच अवस्था नाशिक-पुणे रस्त्याची असून हा महामार्ग सध्या अपघातांचा हॉटस्पॉट बनत आहे. शहरातून जाणारा नाशिक- पुणे रोड सिन्नर फाट्यापर्यंत खराब आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीत येणारा अंदाजे १८ किलोमीटरचा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे. खड्ड्यामुळे वाहनांची गती मंदावलेली असून रोज लहान-मोठे अपघात घडत आहे.

सातारा जिल्ह्यात शिरवळ ते कऱ्हाड दरम्यानचा महामार्गावरील प्रवास धोकादायक झाला आहे. शिरवळ ते खंबाटकी घाटापर्यंत वाहतुकीचा ‘विकएंड’ला खोळंबा होत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे.

शिरवळजवळील शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सेवा रस्त्याला वाहतूक वळविल्याने, तसेच रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होते. शिरवळ, केसुर्डी ते खंडाळ्यापर्यंत, तसेच खंबाटकी घाटातही जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकास मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यात वारंवार पडत असलेले डांबर, खडी उखडून रस्त्याच्या कडेला पसरली जाते. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळते.

या महामार्गावरील पाणी निचऱ्याची व्यवस्थाच नसल्याने पावसाळ्यात मोठी गैरसोय होत असून, महामार्गावरील खड्डे वेळेत भरले जात नसल्याने अपघातांची संख्याही वाढत आहे. मात्र महामार्ग सुस्थितीत नसतानाही टोलची वसुली सुरूच असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.