पुणे (Pune) : चांदणी चौकातील (Chandani Chowk) एनडीए व बावधनला जोडणाऱ्या पुलासाठी गर्डर टाकण्याच्या कामास सोमवारी (ता. ३) रात्री साडेबारा वाजता सुरवात झाली. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३०० टनाच्या दोन क्रेनचा वापर केला. टाकलेला गर्डर हा ५८ मीटर लांबीचा, तर १५० टन वजनाचा आहे. गर्डरच्या कामासाठी १५० कामगारांचे हात झटले. ‘पुलर’ नावाच्या वाहनातून गर्डरची वाहतूक करण्यात आली.
चांदणी चौकाच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक रात्री साडेबारा वाजता बंद केली. दुचाकी, चारचाकीसह अन्य मोठी वाहने सेवा रस्त्यावरून सोडण्यात आली, तर ट्रेलरसारख्या अवजड वाहनांना प्रवेश बंद केला होता. अवजड वाहनांना वाहतूक पोलिसांनी खेड शिवापूर व उर्से टोल नाका येथेच थांबविले होते. साडेतीन वाजता काम पूर्ण होताच वाहतूक पूर्ववत झाली. पुढील नऊ दिवस नऊ गर्डर टाकले जाणार आहेत.
गर्डरचे काम पूर्ण झाल्यावर स्लॅब टाकण्याचे काम केले जाईल. हे काम पुढील सहा ते सात दिवस चालेल. ३१ जुलैपर्यंत चांदणी चौकातील सर्वच कामे पूर्ण करू, असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी व्यक्त केला.
नवीन पुलाची क्षमता अधिक...
बावधन-एनडीएला जोडणारा हा पूल १५० मीटर लांबीचा व ३२ मीटर रुंदीचा आहे. पूर्वीचा पूल हा ५० मीटर लांबीचा व २० मीटर रुंदीचा होता. पूर्वीच्या तुलनेत पुलाची लांबी व रुंदी वाढली आहे. तसेच पुलाखाली पूर्वीप्रमाणे पिलर नाहीत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही. पुलाच्या मजबुतीसाठी पुलाच्या दोन्ही बाजूलाच पिलर उभे केले आहे.
वाहतुकीतील बदल...
मुंबई-बंगळूर महामार्गावर चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू असून, गर्डर बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एनडीए-पाषाण रस्ता मंगळवारपासून (ता. ४) १५ जुलैपर्यंत रात्री १२.३० ते ३.३० या कालावधीत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. याबाबतचे परिपत्रक शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी काढले आहे.
पर्यायी मार्ग (जड वाहने वगळून केवळ हलकी आणि चारचाकी वाहनांसाठी)
- सातारा ते मुंबई महामार्गावरील वाहतूक वेदभवन सेवा रस्त्याने पुढे मुंबईकडे इच्छितस्थळी जाईल.
- मुंबई ते सातारा वाहतूक पाषाण रस्त्याने वळवून रॅम्प क्रमांक सहावरून वारजेकडे इच्छितस्थळी जाईल.