ganeshkhind road, university chowk tendernama
पुणे

Pune : मोठमोठे खड्डे, वाढलेले अपघात अन् धुळीचे साम्राज्य... पुण्यातील 'या' रस्त्याची अवस्था कुत्रेही खाईना

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्यावर पसरलेली खडी, त्यावरून दुचाकी घसरून वाढलेले अपघातांचे प्रमाण आणि सर्वत्र पसरलेले धुळीचे साम्राज्य अशी अवस्था झाली आहे गणेशखिंड रस्त्याची. यामुळे कॉसमॉस बँक ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक या दरम्यान वाहतूक संथ होऊन दीड ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिक समस्यांना तोंड देत असून याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे.

रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने, पाऊस पडल्यावर वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे अनेक दुचाकी खड्ड्यात आदळून बंद पडतात. त्यामुळे वाहतूक संथ होऊन कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळे नागरिकांना इच्छितस्थळी वेळेत पोहचता येत नाही. रस्त्यावरील धूळ वाहनचालकांच्या नाकात, तोंडात जाऊन प्रवाशांना श्वसनाचे आजार होतात. याबाबत स्थानिक रहिवासी सुहास अनगळ यांच्यासह इतर रहिवाशांनी याबाबत कैफियत मांडली.

चिखल तुडवत पादचाऱ्यांचा प्रवास

कॅासमॅास बॅंक ते सेनापती बापट रस्ता या मार्गावर पदपथ शिल्लक राहिलेला नाही. रस्त्याच्या बाजूला सिंमेटचे ब्लॉक, कचरा, माती, राडारोडा, केबल, झाडांच्या फांद्या, खडी पसरलेली आहे. या ठिकाणी नियमित सांडपाणी रस्त्यावरून वाहते. पादचारी मार्ग शिल्लक राहिला नसल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना रस्त्याच्या बाजूने चिखल तुडवत चालावे लागते.

वाहतूक कोंडी नित्याचीच

- सकाळी साडेनऊ ते साडेअकरा, रात्री साडेसात ते साडेनऊ या वेळेत प्रचंड वाहतूक कोंडी

- वाहतूक कोंडीत दीड किलोमीटरसाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो

- मेट्रोच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांतून रस्त्यावर पाणी सोडले जाते

ड्रेनेजची झाकणे खराब झाल्याने रस्त्यावरून दुर्गंधीयुक्त पाणी वाहते. कॉसमॉस बँकेच्या समोर वळणावर वॅार्डन सोबत कायमस्वरूपी वाहतूक पोलिस असावा. रस्त्यावर पडलेले खड्डे तत्काळ दुरुस्त करावे. पदपथाचे काम मार्गी लावण्याची गरज असून, या मार्गावरून लहान बस सुरू केल्यास वाहतूक कोंडी कमी होईल.

- संजय जाधव, अध्यक्ष, चतु:श्रृंगी नागरिक कृती समिती

प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधींचे या भागाकडे लक्ष नाही. खड्डे, वाहतूक कोंडीमुळे येथील व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनगळवाडी येथील पाच ते सहा हजार नागरिकांना याचा फटका बसतो.

- भगवान देशपांडे, अध्यक्ष, चतु:श्रृंगी मित्र मंडळ ट्रस्ट

मेट्रोच्या आजूबाजूचे काम करण्याची जबाबदारी मेट्रोची आहे. सध्या मेट्रोचे काम सुरू असल्याने क्रेन, गर्डर यामुळे रस्त्यावर खड्डे पडतात. याकडे मेट्रो प्रशासन लक्ष देत नाही. पदपथाचे काम मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देतो.

- अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका