पुणे (Pune) : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा (Pune - Nashik Semi Highspeed Railway Project) प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनचे (MAHARAIL) व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी रविवारी दिली.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी भेट घेतली असता ते म्हणाले, हा प्रस्ताव मुळचा महारेलचा आहे. तो आता रेल्वे मंत्रालयाकडून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.
पुणे, नगर व नाशिक या तीन जिल्ह्यांना जोडणारा हा प्रकल्प अनेक वर्षांपासून केंद्राच्या मंजुरीची प्रतिक्षा करत आहे. मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्रालयाला भेट दिली होती. प्रकल्पाला गती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. गेल्या फेब्रुवारीत रेल्वे मंत्रालयाने प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी दिली होती. यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाला निधीचा बूस्टर देण्याची घोषणाही झाली. मात्र प्रकल्प रखडला आहे.
पुणे-नाशिक दरम्यान रस्ते प्रवासाला लागणारा वेळ कमी करण्यासाठी आणि ही दोन्ही शहरे रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा रेल्वे मार्ग पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर आदी तालुक्यांतून ५४ गावांतून जाणार आहे. त्यासाठी सुमारे पावणे पाचशे हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
भूसंपादनाला साडेचार हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यापैकी रेल्वे मंत्रालय व राज्य सरकार प्रत्येकी वीस टक्के वाटा देणार असून, उर्वरित निधी कर्ज स्वरूपात उभारला जाणार आहे.
दरम्यान, ‘महारेल'तर्फे नागपूर ते नागभीड ब्रॉडगेज मार्गाचे काम वर्षभरात पूर्ण केले जाईल. याशिवाय मुंबईतील रेल्वे शंभर वर्षे जुन्या उड्डाणपुलांच्या जागी नवे उड्डाणपूल बांधण्यात येतील. राज्यात विविध ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत,’ अशी माहितीही त्यांनी दिली.