Pune Airport Tendernama
पुणे

Pune : मोठी बातमी! 'या' कारणांमुळे घसरला पुणे विमातळाचा दर्जा?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : विमानतळावर पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांच्या सर्वेक्षणात पुण्याची क्रमवारी ७० वरून ७२ झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण व कॅनडास्थित ‘एसीआय-एएसक्यू’ (एअरपोर्ट कौउंसिल इंटरनॅशनल-एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी) यांनी आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात पुणे विमानतळाचा प्रवासी सुविधांच्या बाबतीतला दर्जा घसरला आहे. एकीकडे प्रवासी संख्येत पुणे विमानतळ देशांतील व्यस्त विमानतळामध्ये नवव्या स्थानी पोचला आहे, तर दुसरीकडे प्रवाशांना सेवा देण्यामध्ये मात्र घसरण होत आहे.

विमानतळावर प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा-सुविधांवर आधारित हे सर्वेक्षण केले जाते. यासाठी थेट प्रवाशांची मते जाणून घेतली जातात. ‘एसीआय-एएसक्यू’चे हे सर्वेक्षण विविध निष्कर्षांच्या आधारे केले जाते. गुणवत्ता वाढीसाठी यात भारतीय विमानतळ प्राधिकरणदेखील सहभागी होते. यासाठी विमानतळाची वर्गवारी केली जाते.

पुणे विमानतळ हे ‘बेस्ट एअरपोर्ट बाय साईज' या वर्गात असून यात देशातील १५ विमानतळाचा समावेश आहे. १५ पैकी पुणे विमानतळ ११व्या स्थानी आहे, तर दर्जा बाबत ७२व्या क्रमांकावर आहे. जुलै ते सप्टेंबर २३च्या तिमाहीत पुणे विमानतळ ७०व्या स्थानी होते, मात्र ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३च्या तिमाही सर्वेक्षणात पुणे विमानतळ ७२व्या स्थानी पोचले आहे.

प्रवाशांना सुविधा पुरविण्यात पुणे विमानतळ कमी पडल्यानेच पुणे विमानतळाचा दर्जा घसरला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

सर्वेक्षणाचे निकष

- स्वच्छतागृहाची स्थिती

- टर्मिनलमधील स्वच्छता

- चेक इन काऊंटर व सेक्युरिटी काऊंटरमध्ये प्रवाशांना लागणारा वेळ

- कर्मचाऱ्यांचा प्रवाशांशी होणारा संवाद

- टर्मिनलमधील खाद्य पदार्थाचे स्टॉल

- तसेच इतर २८ निकष

दर्जाबाबत पुणे विमानतळाची झालेली घसरण ही अत्यंत चिंताजनक आहे. प्रवासी संख्या व विमानांच्या उड्डाणांची संख्या वाढत असताना सेवा-सुविधांच्या दर्जात कमी पडणे ही योग्य बाब नाही. नागरी उड्डाण मंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालणे गरजेचे आहे.

- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ