पुणे (Pune) : पुणे व पिंपरी-चिंचवड (Pune And Pimpri Chinchwad) शहरातील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला (SRA) गती देण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर शहरातील चार ते पाच जागा निश्चित करून, टेंडर मागवून विकसकाची नियुक्ती करून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकल्प वेळेत मार्गी लावण्याबरोबरच झोपडीधाकरांचे पुनर्वसन करणे शक्य होणार आहे.
प्रकल्प मंजुरीपासून ते पूर्ण करणेपर्यंत अनेक अडचणी येत असल्याने एसआरए प्राधिकरणानेच पुनर्वसन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर शहरात चार ते पाच झोपडपट्ट्या निश्चित केल्या जाणार आहेत. त्यासाठी टेंडर मागवून विकसकाची नेमणूक करण्याचा विचार आहे.
यापूर्वी प्राधिकरणाकडून रखडलेल्या प्रकल्पांबाबत असा प्रयोग करण्यात आला होता. त्यासाठी जाहिरात देऊन टेंडरही मागविल्या होत्या. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, आता नव्याने पुन्हा प्राधिकरणाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
एसआरए प्रकल्प राबविण्यासाठी जवळपास १९ टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे अनेकदा प्रकल्पांना विलंब होतो. तो कमी करण्यासाठी प्राधिकरणाकडून स्वत:च्या स्तरावर पॅनेल तयार करून प्रकल्पांच्या जागांच्या मोजणीसह अन्य कामे करण्यासाठी संस्थांची नेमणूक करण्यात येणार आहे. विकसकांना या पॅनेलवरील संस्थांची नेमणूक करून प्रकल्पासाठी आवश्यक असलेली मोजणीसह अन्य कामे वेळेत करणे शक्य होणार आहे, असेही गटणे यांनी सांगितले.
दृष्टिक्षेपात
- २००५ मध्ये एसआरए प्राधिकरण स्थापन
- २३ वर्षांत केवळ ६१ पुनर्वसन प्रकल्प पूर्ण
- ३०२ प्रकल्पांना मंजुरी
- १६४ प्रकल्प धिम्या गतीने सुरू
- २० हून अधिक प्रकल्प मान्यतेनंतरही रखडले
झोपडपट्ट्यांची सद्यस्थिती
- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टीची संख्या - ५५७
- झोपड्यांची संख्या - २ लाख
- झोपडपट्टीतील लोकसंख्या - ११ लाख २७ हजार
- घोषित झोपडपट्ट्यांची संख्या - २५८
- अघोषित झोपडपट्ट्यांची संख्या - २९९
- बांधकाम योग्य झोपडपट्ट्यांची संख्या - ४२८
- बांधकाम अयोग्य झोपडपट्ट्यांची संख्या - १२८
प्राधिकरणाच्या माध्यमातून टेंडर मागवून विकसक नेमणे आणि त्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्याचा विचार सुरू आहे. प्रायोगिक तत्वावर शहरातील चार ते पाच जागा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. लवकरच जागा निश्चित करून या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.
- निलेश गटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए