Namami Chandrabhaga Tendernama
पुणे

Pune : पुणे जिल्ह्यातील 32 नद्यांबाबत मोठा निर्णय; DPR तयार करण्यास ग्रीन सिग्नल

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : ‘नमामी चंद्रभागा’ उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यात येणाऱ्या सर्व नद्यांचे सर्वेक्षण करून सर्वंकष प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यास केंद्र सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यासाठी मुंबई आयआयटी (IIT Mumbai) आणि तेलंगण येथील वारंगल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे.

नद्यांमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी, अतिक्रमणे, आजूबाजूला असलेली गावे आणि कंपन्यांचा अभ्यास करण्याबरोबरच नदी सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांचा समावेश अहवालात असेल.

नदी संरक्षण आणि प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘नमामी गंगे’ उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प हाती घेतला आहे. त्याच धर्तीवर पुणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांचे प्रदूषण कमी करण्याबरोबरच त्यांचे संरक्षण आणि त्या पुनर्जीवित करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी ‘नमामी चंद्रभागा’ प्रकल्प हाती घेतला आहे.

जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या पुढे चंद्रभागेला येऊन मिळतात, तर चंद्रभागा पुढे कृष्णा नदीला मिळते. या सर्व नद्यांचा एकत्रित सुधारणा प्रकल्प अहवाल तयार करण्यासंदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाने केंद्र सरकारला पाठविला होता. त्यास केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाने (एनआरसीडी) तत्त्वतः मान्यता दिली.

यासंदर्भात विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, ‘‘प्रदूषण कमी करणे, सुशोभीकरण आणि पूर नियंत्रण अशा तीन पातळींवर पुणे विभागात उपक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे. ‘नमामी चंद्रभागा’सारख्या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील नदीपात्राचा विकास करणे, पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांतील प्रदूषित पाणी नदीत जाऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीतील सांडपाण्याचे ऑडिट करणे, त्या माध्यमातून शुद्धीकरणात असलेली तूट भरून काढण्यासाठीच्या उपयोजना करणे, विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून आदी उपाययोजना प्रस्तावित आहेत. त्यासाठी सर्वंकष प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे.’’

जिल्ह्यातून वाहतात ३२ नद्या...

पुणे जिल्ह्यातून ३२ नद्या वाहतात. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नाशिक, तर त्याखालोखाल पुणे जिल्ह्यातून नद्या वाहतात. देशातील सर्वांत मोठ्या नद्यांमध्ये कृष्णा नदीचा दुसरा नंबर लागतो. या नदीचा उगम महाबळेश्‍वर येथे होतो. सोलापूरजवळ कृष्णानदीला चंद्रभागा येऊन मिळते. पुढे बंगालच्या उपसागरास जाऊन ती मिळते.

सुमारे १४०० किलोमीटर लांबीची ही नदी असून, तिचे खोरे दोन लाख ५८ हजार ९४८ किलोमीटर एवढे आहे. पुराणात ‘कृष्णावेण्ण’ नावाने, तर जातक कथांमध्ये ‘कान्हपेर्णा’ नावाने नदीचा उल्लेख आढळतो.