PMPML Tendernama
पुणे

Pune : सचिंद्र प्रताप सिंह यांचा मोठा निर्णय; पीएमपीचा रोजच्या 9 हजार किलोमीटरचा खर्च वाचणार

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पीमपीच्या ‘सीएनजी’ बसना इंधनासाठी दुसऱ्या आगारात चकरा माराव्या लागणार नाहीत. प्रशासन आणखी सात आगारांमध्ये ‘सीएनजी’चा पुरवठा करणार आहे. त्यामुळे फक्त सीएनजीसाठी रोज होणाऱ्या नऊ हजार किलोमीटरच्या अनावश्यक फेऱ्यांना (डेड किलोमीटर अर्थात निःशुल्क धाव) ब्रेक लागेल. त्यातून पीएमपीचे रोजचे किमान तीन लाख रुपये वाचतील.

एमएनजीएल (महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ) १५ वर्षांनंतर पीएमपीसाठीच्या सेवेचा विस्तार करीत आहे. सध्या पाच आगारांत सीएनजी पुरवठा होतो. आता एकूण १२ आगारांत ही सुविधा असेल. याचा १४२१ गाड्यांना फायदा होईल. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होईल.

सध्या अन्य आगारांमधील ‘सीएनजी’ गाड्यांच्या चालकांना इंधनासाठी दुसऱ्या आगारात जावे लागते. त्यासाठी गाड्या रिकाम्या धावतात. प्रवासी नसल्याने या फेरीतून उत्पन्न मिळत नाही, उलट खर्चच होतो. दुसरीकडे इंधनासाठी गेलेली बस मूळ आगारात येण्यासाठी ३० ते ४० मिनिटांचा वेळ जातो. त्यामुळे प्रवाशांना वाट पाहत थांबावे लागते.

लवकरच आगारांचे सर्वेक्षण

पीएमपीची एकूण १५ आगारे आहेत. सध्या न. ता. वाडी, पिंपरी, कोथरूड, हडपसर व कात्रज या पाच आगारांत सीएनजीचा पुरवठा होतो. उर्वरित आगारांच्या सर्वेक्षणातून सात आगारांची निवड होईल. हे सर्वेक्षण ‘एमएनजीएल’ करेल. यात वाहिनीपासून अन्य तांत्रिक बाबी तपासल्या जातील. सीएनजी पुरवठ्याचा सर्व खर्च ‘एमएनजीएल’ करेल.

डेड किलोमीटर म्हणजे काय?

ज्या बस फेरीतून ‘पीएमपी’ला उत्पन्न मिळत नाही, पण इंधनाचा खर्च करावा लागतो अशा फेरीला ‘डेड किलोमीटर’ किंवा ‘निःशुल्क धाव’ असे म्हणतात.

पीएमपी बस संख्या

स्वमालकीच्या : ९८१

डिझेल ः २००

सीएनजी ः ७८१

ठेकेदारांकडील ः १०९८

(सीएनजी ः ६४०, इलेक्ट्रिक ४५८)

सीएनजीच्या एकूण : १४२१

‘निःशुल्क धाव’ थांबावी म्हणून पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. सर्वेक्षण झाल्यानंतर आगारांची निवड होईल. यामुळे परिणामी प्रवाशांच्या वेळेत बचत होईल. याशिवाय रोजचे किमान तीन लाख रुपये वाचतील.

- सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे