PMC Tendernama
पुणे

Pune: पाणी शुद्धीकरणासाठी पालिकेचा मोठा निर्णय; टेंडरही निघाले

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मैला शुद्धीकरण केंद्रातील पाणी शुद्ध करून नदीत सोडले जाते, त्यामुळे हे पाणी पुन्हा अशुद्ध होत आहे. त्याचा फटका शेतीला बसत आहे. त्यामुळे खराडी मैला शुद्धीकरण केंद्रात शुद्ध केलेले पाणी नदीखालून जलवाहिनीद्वारे मुंढवा जॅकवेलमध्ये आणून ते बेबी कॅनॉलमध्ये सोडले जाणार आहे. यासाठी तीन कोटी रुपयांचे टेंडर (Tender) काढले आहे. या कामास पाटबंधारे विभागानेही तत्त्वतः मान्यता दिली आहे.

महापालिकेने पाटबंधारे विभागासोबत केलेल्या करारानुसार शहरातील मैलापाणी शुद्ध करून वर्षाला ६.५ टीएमसी पाणी शेतीसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यासाठी सुमारे २०० कोटी रुपये खर्च करून महापालिकेने मुंढवा बंधारा येथे जॅकवेल बांधले आहे. तेथून बेबी कॅनॉलपर्यंत मोठी जलवाहिनी टाकली आहे. शहरातील १० मैलाशुद्धीकरण केंद्रात शुद्ध झालेले पाणी नदीत सोडले जाते. हे पाणी मुंढवा बंधारा येथे अडवून तेथून ते जॅकवेलमध्ये पंपिंग करून बेबी कॅनॉलमध्ये सोडले जाते.

खराडी येथे ४० एमएलडी क्षमतेचा मैला शुद्धीकरण प्रकल्प असून, तेथे आणखी ३० एमएलडी क्षमतेचा नवा प्रकल्प उभारला जात आहे. सध्या शहरातील सर्व सांडपाणी केंद्रात शुद्ध केलेले पाणी नदीत सोडले जाते, हे पाणी मुंढव्यातील बंधाऱ्यातून उचलून जॅकवेलद्वारे हे पाणी बेबी कॅनॉलमध्ये सोडले जाते. पण, मैला शुद्धीकरण केंद्रातील हे पाणी नदीत सोडल्यानंतर पुन्हा प्रदूषित होत आहे. हे पाणी शेतीला दिल्याने शेतीचे नुकसान होत आहे. खराडीतील मैला शुद्धीकरण केंद्रातून जलवाहिनी टाकून जॅकवेलपर्यंत जाईल. तेथून हे पाणी बेबी कॅनॉलमध्ये टाकले जाईल. त्यामुळे शेतीला शुद्ध पाणी मिळणार आहे.

आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘जॅकवेलमधून शेतीसाठी दिले जाणारे पाणी हे शुद्ध असावे, यासाठी खराडीतील मैला शुद्धीकरण केंद्रातून जलवाहिनीद्वारे जॅकवेल येथे पाणी आणले जाईल. या कामास पाटबंधारे विभागाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे तातडीने काम सुरू केले जाईल.’’