Stamp Tendernama
पुणे

Pune : जागा, फ्लॅट खरेदी-विक्री व्यवहारातील गैरप्रकारांना बसणार आळा; 'ही' सुविधा...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : जुने दस्त शोधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने विकसित केलेल्या ‘ई-सर्च’ संगणक प्रणालीमध्ये सुधारणा करून ‘ई-सर्च २.१’ ही प्रणाली आणली आहे. त्यामुळे दस्त शोधणे आता अधिक गतिमान झाले आहे.

एकाच जागेची किंवा सदनिकांची विक्री अनेकांना विकण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. एक सदनिका अनेक बॅंकेत गहाण ठेवून त्याआधारे कर्ज घेतल्याचे प्रकारही घडतात. यामध्ये आर्थिक फसवणूक होते. या प्रकाराला आळा घालण्याबरोबरच जमीन, सदनिका अथवा दुकाने यांच्या खरेदी-विक्री व्यवहारातील गैरप्रकाराला आळा घालणे आणि जुने दस्त शोधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ‘ई-सर्च’ संगणक प्रणाली विकसित केली होती. ही सुविधा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या www.igr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

मागील आठ वर्षांत ‘ई-सर्च’ प्रणालीमध्ये विभागाकडून कोणताही बदल करण्यात आला नव्हता. गेल्या काही दिवसात तंत्रज्ञान झालेले बदल आणि ई-सर्चमध्ये दस्त शोधण्यास, डाऊनलोड करण्यास लागणारा विलंब याबाबत सातत्याने तक्रारी आल्याने नोंदणी विभागाने ई-सर्च प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ‘ई-सर्च २.१’ ही प्रणाली विकसित करून लागू केली आहे. मात्र, २००२ ते २०१२ मधील दस्त पूर्वीच्या ‘ई सर्च’ प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. उर्वरित सर्व प्रकाराचे जुने दस्त या नव्या प्रणालीत उपलब्ध करून दिल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

असे शोधता येतील जुने दस्त

www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘रेकॉर्ड आणि पेमेंट्‌स’ या सदराखाली ‘ई-सर्च’ हा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये सुरुवातीस वर्ष, जिल्हा, तालुका, गाव, दस्ताचा प्रकार आणि सर्व्हे नंबर, सिटी सर्व्हे नंबर अथवा दस्त नंबर ही माहिती भरल्यानंतर ‘ई-सर्च’मध्ये मिळकतीबाबत नोंदविण्यात आलेल्या व्यवहारांची यादी मिळणार आहे.

‘ई-सर्च २.१’ मध्ये हे दस्त उपलब्ध

सध्यस्थितीत ‘ई-सर्च २.१’ मध्ये १९८५ ते २००२ आणि २०१२ ते २०१३ पर्यंतचे दस्त उपलब्ध आहेत. सध्या २००२ ते २०१२ या दरम्यानचे दस्त उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असून दोन महिन्यांत हे दस्त ‘ई-सर्च २.१’ मध्ये उपलब्ध होतील.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ‘ई-सर्च’ प्रणालीमध्ये सुधारणा करून ‘ई-सर्च २.१’ ही नवी प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे जुने दस्त सर्च करणे आणि ते डाऊनलोड करणे अधिक सोपे झाले आहे.

- अभिजित देशमुख, नोंदणी उप महानिरीक्षक