APMC Tendernama
पुणे

Pune APMC : पार्किंग टेंडरमध्ये मोठा घोटाळा; कोणी लावला 32 लाखांचा चुना?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Pune APMC) पार्किंग टेंडरमध्ये मोठा घोटाळा (Tender Scam) झाल्याची तक्रार तीन संचालकांनी पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. या तक्रारीनुसार बाजार समितीचे ३२ लाख रुपयांचे नुकसान होत आहे. याची चौकशी करण्याची मागणी संचालकांनी केली आहे.

तसेच, बाजार समितीने नियमबाह्य पद्धतीने दिलेले विविध ठेके आणि अनियमित ठेकेदारांचे पार्किंग ठेके तातडीने रद्द करून ई-टेंडर प्रक्रिया राबविण्याची मागणी बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी, रवींद्र कंद आणि नानासाहेब आबनावे यांनी केली आहे.

बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातील जुन्या बटाटा शेडच्या शेजारील मोकळ्या जागेवर वाहनतळ चालविण्याच्या कामाचा ठेका ज्या कंपनीला दिला आहे, ते कंपनीचे ठेकेदार पार्किंग ठेक्याची रक्कम वेळेत भरत नाही. तसेच हे ठेकेदार नेमून दिलेल्या पार्किंगच्या जागा सोडून इतर ठिकाणचे पार्किंगचे शुल्कदेखील जमा करीत आहेत. हा बाजार समितीसोबत केलेल्या करारनाम्यामधील अटी-शर्तींचा भंग आहे. त्यामुळे या कंपनीला देण्यात आलेला पार्किंगचा ठेका रद्द करून नव्याने ई-टेंडर प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुख्य बाजार आवारातील गेट क्र. १च्या लगत वजनकाट्यामागील रिकाम्या जागेत (दुचाकी, मोटार कार) वाहनतळाचा ठेका बाजार समितीने ई-टेंडर प्रक्रिया राबवून दिलेला होता. त्यावेळी वार्षिक ठेका ६२ लाख ७२ हजार रुपयांना दिला होता. या वाहनतळामधून बाजार समितीला १० महिन्यांमध्ये केवळ ३० लाख ५६ हजार ७५० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांवर १६ लाख ४ हजार रुपये खर्च झाला आहे.

मागील ई-टेंडरनुसार या वाहनतळामध्ये १० महिन्यांत बाजार समितीला ५२ लाख २६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असते. तसे न होता मागील दहा महिन्यांत ३७ लाख ७४ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे ई-टेंडर प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

मुख्य प्रवेशद्वारासमोरील ट्रक पार्किंग सुमारे साडेतीन एकर जागेला ३७ लाख ३७ हजार भाडे आहे. तर बटाटा शेड जवळील साधारणतः चार एकर जागेला २२ लाख रुपये भाडे आकारले जात आहे. बटाटा शेडजवळील जागा जास्त असूनदेखील कमी भाडे आकारले जात आहे. बाजार समितीने अनेक ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ठेके दिले आहेत. यामुळे बाजार समितीचे वर्षाला कोट्यवधींचे नुकसान होत आहे. याबाबत पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दिली आहे.

- सुदर्शन चौधरी, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

बाजार समितीची ई-टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. ई-टेंडर रक्कम ठरल्यानंतर नुकसानीबाबतची चौकशी केली जाईल.

- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे