पुणे (Pune) : बाणेर - औंध लिंक रस्त्यावरील (Baner - Aundh Link Road) मेडिपॉइंट चौक ते बाणेर ज्युपिटर हॉस्पिटल चौक व मुळा नदीच्या निळ्या पूर रेषेतील पत्राशेड व अनधिकृत बांधकामांवर औंध - बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण विभाग व बांधकाम विकास विभाग झोन ३ च्या वतीने सुमारे ६७ हजार चौरस फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली.
मुळा नदीच्या निळ्या पूर रेषेमध्ये यापूर्वी कारवाई करून बेकायदा बांधकामे पाडण्यात आली होती, मात्र या ठिकाणी नव्याने बांधकामे केल्याचे निदर्शनास आल्याने या भागात पुन:श्च कारवाई केल्याचे पुणे महापालिकेचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले.
सहायक महापालिका आयुक्त संदीप खलाटे, बांधकाम विभाग झोन क्रमांक तीनचे कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता निवृत्ती उतळे, कनिष्ठ अभियंता संदेश कुवळमोडे, अजित सणस, विश्वनाथ बोटे, डी. एन. जगताप, आरेखक नविन मेहेत्रे, सूरज शिंदे, प्राची सर्वगोड आदींनी कारवाईत भाग घेतला.
पोलिस निरीक्षक राजू अडागळे, राजकुमार केंद्रे व त्यांच्या पथकाने पाच जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर, एक क्रेनच्या मदतीने ही कारवाई केली.