Pune Airport Tendernama
पुणे

Pune News: पुणे विमानतळावरील पार्किंगबाबत मोठा निर्णय; आता...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे विमानतळावर (Pune Airport) प्रवाशांना सोडण्यासाठी व घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या कॅबचे पार्किंग (Cab Parking) आता एरोमॉलमध्ये (Aero Mall) सुरू झाले आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात कॅबच्या बेशिस्त पार्किंगमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत आता बऱ्यापैकी घट झाली आहे. प्रवाशांना तीन मिनिटांत कॅब उपलब्ध होत आहे.

पुणे विमानतळावर दिवसभरात सुमारे अडीच ते तीन हजार कॅब दाखल होतात. काही कॅबचालक तिथेच थांबून राहतात. तर काही प्रवाशांच्या प्रतिक्षेत रस्त्यावर बाजूला थांबतात. अशा थांबणाऱ्या कॅबचालकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे विमानतळाच्या परिसरात सतत वाहतूक कोंडी होते. आता मात्र विमानतळ प्रशासनाने ओला, उबरच्या कॅबचालकांना विमानतळाच्या आवारात न थांबता एरोमॉलमध्ये थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. २५ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता एरोमॉल येथूनच कॅब पकडावी लागेल.

वाहनधारकांचा प्रतिसाद कमीच
ओला, उबरचे पार्किंग एरोमॉलमधून सुरू झाल्याने मॉलमध्ये वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र अजूनही दुचाकी व चारचाकींची संख्या कमीच आहे. ओला, उबरचे चालक मॉलमध्ये शिफ्ट झाले. मात्र, प्रवाशांना सोडायला येणारे खासगी वाहनचालक आपली वाहने मॉलमध्ये लावण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे एरोमॉलच्या पार्किंगला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

इमारतीचा निर्णय चुकला?
पुणे विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणून १२० कोटी रुपये खर्चून मल्टिलेव्हल कार पार्किंग असलेला एरोमॉल बांधण्याचा निर्णय घेतला. २६ नोव्हेंबर रोजी याचे उद्‍घाटन झाले. मात्र, दोन महिन्यानंतरही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. पार्किंगसाठी अनेकांना १५ ते २० मिनिटे खर्च करणे योग्य वाटत नाही. शिवाय कोची, हैदराबाद सारख्या मोठ्या विमानतळांजवळही मल्टिलेव्हल कार पार्किंग नाही. त्यामुळे पुण्यात याचा घाट का घातला, असाही प्रश्न विचारला जात आहे.

वाहनधारकांच्या सोयीसाठी चांगल्या दर्जाचे मल्टिलेव्हल पार्किंग बांधले. आता तर ओला, उबरच्या कॅबदेखील मल्टिलेव्हल पार्किंगमध्ये येत आहेत. पार्किंगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे.
- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ