Pune Airport Tendernama
पुणे

Pune Airport : कटकट संपली; पुणे विमानतळावर 'या' प्रवाशांना का मिळतोय अवघ्या काही सेकंदात प्रवेश?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे विमानतळावर (Pune Airport) ‘डीजी यात्रा'चा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. सुमारे ५७ टक्के प्रवासी ‘डीजी यात्रा’चा वापर करीत असल्याने त्यास चांगला प्रतिसाद लाभत आहे. ‘डीजी यात्रा’चा वापर करणाऱ्यांत ‘इंडीगो’ने प्रवास करण्याची संख्या जास्त आहे.

प्रवाशांना टर्मिनलवर जाण्यासाठी रांगा लावाव्या लागू नये, म्हणून पुणे विमानतळ प्रशासनाने ३१ मार्च २०२३ पासून दोन्ही टर्मिनल गेट स्कॅनर मशिन बसविले. चार हजार प्रवाशांची चाचणी झाल्यावर ‘डीजी यात्रा’ सेवा सुरू केली. सुरुवातीच्या काळात प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद होता. तर काही विमान कंपन्यांनी देखील याला प्रतिसाद दिला नव्हता. नंतर प्रवासी व विमान कंपनी देखील ‘डीजी यात्रा’ला प्राधान्य दिले.

प्रवाशांना अवघ्या काही सेकंदात टर्मिनलवर प्रवेश मिळत असल्याने वेळेत बचत होत आहे. प्रवाशांना चेक इनसाठी रांगेत वाट पाहत थांबण्याची गरज भासत नाही. त्यामुळे ‘डीजी यात्रा’ ही सेवा घेणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे.

अशी आहे माहिती

पुणे टर्मिनल निर्गमन एकूण प्रवासी : ११,७७५

इंडिगो - ४९१८

विस्तारा - ३५१

स्पाईस जेट - ५०२

एअर इंडिया - ४५३

अकासा - ४५२

एकूण प्रवासी : ६६७६ (डीजी यात्रा )

(ही आकडेवारी मागच्या आठवड्यातील शुक्रवारची )

हे कसे काम करते

- प्रवासा पूर्वीच प्रवाशांनी डीजी यात्रा हे ॲप डाऊनलोड करावे.

- डीजी यात्रा ही मोबाईल अॅप केंद्रीत प्रणाली आहे. प्रवाशांना आधार क्रमांक लिंक करून त्याचे सर्व तपशील डीजी यात्रा अॅपवर त्यांचे तपशील नोंदवावे

- त्यानंतर स्वतःचा फोटो अपलोड करावा. ॲप वापरादरम्यान, प्रवाशाचे बायोमेट्रिक तपशील घेतले जातील.

- डीजी यात्रा अॅपमध्ये नोंदणी झाल्यानंतर विमानतळावर प्रवाशाला चेक-इनसाठी वेळ लागणार नाही.

- टर्मिनलच्या बाहेरच्या बाजूला बसविलेल्या स्कॅनर समोर प्रवाशांचा चेहरा स्कॅन होईल.

- त्यानंतर सीआयएसएफचे जवान प्रवाशांचे स्‍कॅन केलेले छायाचित्र आणि तिकिटाची पडताळणी करतील.

- या प्रणालीद्वारे बनावट तिकीट किंवा दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवेश करू पाहणाऱ्यांना रोखता येते.

याचा फायदा काय :

- डीजी यात्रा ही सुविधा सुरू झाल्यावर प्रवाशांना रांगेत थांबावे लागणार नाही.

- प्रवाशांच्या वेळेत बचत होईल.

- अवघ्या एक ते दोन मिनिटांत प्रवासी ही सर्व प्रक्रिया पार पाडेल.

- ‘सीआयएसएफ’ वरचा ताण हलका होईल.

पुणे विमानतळावर डीजी यात्रा अॅप सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. एकूण प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत ५७ टक्के प्रवासी डीजी यात्रा अॅपचा वापर करीत आहे. या सुविधेमुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होत आहे.

- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे