पुणे (Pune) : पुणे विमानतळावरून (Pune Airport) डिसेंबर महिन्यांत आता पर्यंतची सर्वांत जास्त प्रवाशांची वाहतूक झाली. डिसेंबर २०२२ मध्ये एका महिन्यांत आठ लाख सहा हजार ३४ प्रवाशांनी प्रवास केला, तर सुमारे साडेपाच हजार विमानांची वाहतूक पुणे विमानतळावरून झाली. मागील नऊ वर्षाचा विचार केला, तर डिसेंबर २०२२मधील प्रवाशांची व विमानांची संख्या सर्वांत जास्त असल्याचे आढळून आले.
एका दिवशी १९० उड्डाणे
पुणे विमानतळाच्या ‘विंटर शेड्यूल’मध्ये डिसेंबर महिन्यांत सर्वच विमानांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. डिसेंबर महिन्यांत नाताळची सुट्टी व नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी विमानाने प्रवास करून आपले डेस्टिनेशन गाठले. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत अचानक वाढ झाली. याच काळात एका दिवशी १९० विमानांची विक्रमी वाहतूक झाली. त्या दिवशी प्रवाशांची संख्या ही ३० हजारांच्या घरात गेली होती.
नऊ वर्षातील प्रवासी व विमानांची संख्या
(वर्ष प्रवाशांची संख्या विमानांची संख्या)
२०१४....३ लाख ८० हजार २०४....२ हजार ८३६
२०१५....४ लाख ७४ हजार ७२४....३ हजार ४३८
२०१६....६ लाख ८७८....३ हजार ९४६
२०१७....७ लाख ३६ हजार ३०८....४ हजार ९२२
२०१८....७ लाख ८६ हजार ५६१....५ हजार २०
२०१९....७ लाख ४६ हजार ८१४....४ हजार ८११
२०२०....२ लाख ७५ हजार ३७५....२ हजार २७१
२०२१....५ लाख ५५ हजार ०५०....४ हजार ०६१
२०२२....८ लाख ६ हजार ०३४....५ हजार ४६८
(ही आकडेवारी केवळ डिसेंबर महिन्याची आहे. )
विंटर शेड्यूलचे नियोजन करताना पुणे विमानतळावरून जास्तीत जास्त विमानांना स्लॉट उपलब्ध करून दिले. विमानाची संख्या वाढल्याने परिणामी प्रवाशांच्या संख्येत देखील वाढ झाली. डिसेंबर महिन्यांतील प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे
केवळ प्रवासी संख्या वाढणे हे गरजेचे नाही, तर त्यांना त्या प्रमाणात सुविधा देखील मिळाला हवी. प्रवाशांची संख्या वाढली, तर विमानतळावरील यंत्रणा कोलमडून गेली होती. प्रवाशांना सेक्युरिटी चेकइनसाठी तासन्-तास रांगेत थांबावे लागले होते. तेव्हा विमानतळ प्रशासनाने येणाऱ्या ‘समर शेड्यूल’मध्ये प्रवाशांच्या संख्येचा विचार करूनच सुविधा पुरविणे गरजेचे आहे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ