Muralidhar Mohol Tendernama
पुणे

Pune Airport News : वर्षभरापासून रखडलेला तो प्रश्न मंत्री मोहोळ मार्गी लावणार?

टेंडरनामा ब्युरो

Pune Airport News पुणे : विमानतळाच्या धावपट्टी वाढीमुळे लोहगावला ये - जा करण्यासाठी पर्यायी रस्त्याच्या कामाला परवानगी मिळण्यासाठी महापालिकेकडून (PMC) मागील एक वर्षापासून संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र अजूनही रस्त्याचे काम सुरू करण्यास संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी मिळालेली नाही.

या रस्त्याला परवानगी मिळणार केव्हा आणि रस्त्याचे प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होणार? लोहगावच्या पर्यायी रस्त्यासाठी आणखी किती काळ वाट पाहावी लागणार? असे प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

लोहगाव विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून मागील दीड वर्षापासून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विमानतळाची धावपट्टी वाढविली जात आहे.

दरम्यान, धावपट्टी वाढविल्यानंतर वेकफिल्ड चौकातून लोहगावला जोडणारा रस्ता नागरिकांसाठी बंद होणार आहे. त्यामुळे लोहगावला ये - जा करणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी रस्ता करण्यासाठी महापालिका प्रशासन व हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची मागील वर्षी जून महिन्यात चर्चा झाली होती. त्यानंतर दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून सर्वेक्षणही केले होते.

नवीन रस्त्यासाठी दोन पर्याय सुचविण्यात आले होते. त्यात बर्माशेल झोपडपट्टीजवळून संरक्षण विभागाच्या भिंतीलगत खाणीपासून कलवड रस्त्याने लोहगावला जोडणारा दीड किलोमीटरचा रस्ता आणि केंद्रीय विद्यालयाजवळून संरक्षण विभागाच्या भिंतीलगत खाणीपासून पुढे कलवड वस्ती, लोहगावला जोडणारा रस्ता, असे दोन पर्याय पुढे आले होते. त्यापैकी केंद्रीय विद्यालयाजवळून संरक्षण विभागाच्या भिंतीलगत जाणाऱ्या रस्त्याचा पर्याय निवडण्यात आला होता.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने संरक्षण विभागाला जून २०२४ च्या अखेरीस पर्यायी रस्त्याबाबतची माहिती पाठवून रस्त्याच्या कामास मंजुरी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर संरक्षण विभागाने महापालिकेकडून तांत्रिक माहिती मागविली होती. संबंधित माहिती दिल्यानंतरही संरक्षण विभागाने दुसऱ्यांदा पर्यायी रस्त्यांचे वळण व त्यासंबंधीच्या काही तांत्रिक त्रुटी काढून अद्ययावत माहिती पाठविण्याच्या सूचना महापालिकेला केल्या होत्या.

संबंधित त्रुटीदेखील दूर करून महापालिकेने संरक्षण विभागाला माहिती दिली. ही सर्व प्रक्रिया होऊन आता एक वर्ष उलटले आहे, तरीही संरक्षण विभागाकडून पर्यायी रस्त्यासाठी मंजुरी मिळालेली नसल्याची सद्यःस्थिती आहे.

लोहगावच्या पर्यायी रस्त्याच्या कामाला परवानगी मिळावी, यासाठी संरक्षण विभागाला आवश्‍यक माहिती पाठविली आहे. परंतु अद्याप संरक्षण मंत्रालयाकडून त्यास परवानगी मिळालेली नाही.
- अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका

मुरलीधर मोहोळ यांच्यामुळे आशा पल्लवीत
मुरलीधर मोहोळ हे खासदार झाल्यानंतर त्यांच्याकडे केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. मोहोळ यांनी शहराच्या महापौरपदाची जबाबदारीही सांभाळली होती. हा प्रश्‍न विमानतळाशी व लोहगावमधील लाखो नागरिकांशी निगडित आहे. त्यामुळे लोहगावच्या पर्यायी रस्त्यासाठी मोहोळ संरक्षण विभागाकडे पाठपुरावा करू शकतात, त्यामुळे संबंधित रस्त्यासाठी आता महापालिका प्रशासनाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.