Pune Airport Tendernama
पुणे

Pune Airport News : पुणे विमानतळावर पोहचायला प्रवाशांना का होतोय उशीर?

टेंडरनामा ब्युरो

Pune Airport News पुणे : पुणे विमानतळाच्या परिसरात पावसानंतर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे प्रवाशांनी किमान साडेतीन तास आधीच घरातून निघावे, असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे. विमान कंपन्यांनीही हेच आवाहन केले आहे.

विमानतळ परिसरात गेल्या काही दिवसांत मोठा पाऊस झाला. त्यामुळे येरवडा, धानोरी, लोहगाव, वडगाव शेरी आदी परिसरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. परिणामी विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

अनेक प्रवाशांना विमानतळावर वेळेत पोहोचता आले नाही. अलीकडेच तब्बल ४०० प्रवाशांना विमानतळावर विमानाच्या वेळेत पोहोचता आले नाहीत. त्यामुळे त्यादिवशी ते इच्छित स्थळी जाऊ शकले नाहीत.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना विमानाच्या वेळेआधी दोन तास विमानतळावर दाखल होण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. सध्या पुण्यातील वाहतूक स्थिती लक्षात घेता प्रवाशांना हे आवाहन करण्यात आले.

पावसामुळे काय होते?
- कुणी धावत-पळत विमानतळ गाठते
- कुणी मोटारीतून उतरून दुचाकीवर बसून विमानतळ गाठते
- अनेक प्रवासी ऐनवेळी दाखल होत असल्याने टर्मिनलवर गर्दी
- चेक-इन, सिक्युरिटी चेक, बोर्डिंग गेटवर प्रवाशांची गर्दी

मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यास प्रवाशांनी विमानतळावर लवकर दाखल व्हावे. त्यासाठी घरातून किमान साडेतीन तास आधी निघावे.
- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ