Pune Airport  Tendernama
पुणे

Pune Airport News : पुणे विमानतळावरील वाहतूक कोंडी फुटणार; काय आहेत बदल?

टेंडरनामा ब्युरो

Pune Airport News पुणे : पुणे विमानतळ परिसरात होणारी वाहतूक कोंडी ही केवळ प्रवाशांसाठीच नाहीतर प्रशासनाची देखील डोकेदुखी ठरली होती. त्यावर उपाय म्हणून विमानतळ प्रशासन व वाहतूक पोलिसांनी नवा आराखडा तयार केला आहे.

टी २ (नवीन टर्मिनल) समोरून विमान नगरला जाणारा रस्ता आता खुला होत आहे. यासह आता वापरात असलेला सिंबायोसिसकडे जाणारा व लोहगावकडे जाणारा असे मिळून दोन रस्ते देखील वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. टी २ साठी तीन रस्त्यांवरून वाहतूक सुरू राहणार असल्याने वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत मिळेल. रविवारपासून (ता. १४) वाहतुकीचा नवा आराखडा लागू होणार आहे.

पुणे विमानतळाच्या परिसरात बेकायदेशीरपणे लावण्यात आलेल्या मोटारींमुळे प्रवाशांना येताना - जाताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असे. रात्रीच्या वेळी तर स्थिती अत्यंत खराब होत असे. वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांचे विमान चुकले. त्यामुळे पुणे विमानतळाच्या वाहतूक कोंडीचा विषय हा अनेकांसाठी डोकेदुखी ठरत होता.

टी २ प्रवाशांसाठी खुले झाल्यामुळे वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता होती. मात्र आता विमान नगरला जाणारा रस्ता उपलब्ध होत असल्याने वाहनचालकांची मोठी सोय झाली आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होईल. त्यामुळे वाहनांची विभागणी होणार आहे. परिणामी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

वाहतूक पोलिस व विमानतळ प्रशासनाने मिळून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. यात टी २ पासून विमान नगरला जाणारे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निश्चितच वाहतुकीची कोंडी कमी होण्यासाठी मदत होईल.

- संतोष ढोके, विमानतळ संचालक