Pune Airport  Tendernama
पुणे

Pune Airport News : 'या' कारणामुळे बिघडणार पुणे एअरपोर्टवरील विमानांचे वेळापत्रक?

टेंडरनामा ब्युरो

Pune Airport News पुणे : पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) अपघातग्रस्त विमानाची तपासणी करण्यासाठी दिल्लीहून नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) पथक पुण्यात दाखल झाले आहे.

विमानाची तपासणी करून अपघाताचे कारण आणि जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. याचा अहवाल येण्यास आणखी काही दिवस लागतील, तर दुसरीकडे विमानाची दुरुस्ती होण्यासाठी किमान २५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त विमान संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर हवाईदलाच्या जागेत ठेवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र त्याला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अजून काही दिवस अपघातग्रस्त विमान ‘पार्किंग बे’ची जागा अडवून ठेवणार आहे. त्याचा फटका अन्य प्रवासी विमानांना बसणार हे निश्चित.

पुणे विमानतळावर १६ मे रोजी पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला होता. हे विमान अद्यापही ‘पार्किंग बे’ क्रमांक एकवर जागा अडवून आहे. हे विमान अन्यत्र ठेवण्यासाठी विमानतळावर जागा नाही. ‘डीजीसीए’कडून तपासणीला उशीर होत असल्याने विमान दुरुस्तीला देखील उशीर लागत होता.

आता ‘डीजीसीए’चे पथक आले असले तरीही अपघातग्रस्त विमानाचे काही स्पेअर पार्ट उपलब्ध होत नसल्याने दुरुस्तीला किमान एक महिना लागू शकतो. त्याचा फटका अन्य प्रवासी विमानांना बसू नये म्हणून ते विमान ‘पार्किंग बे’ वरून हटवून अन्य ठिकाणी ठेवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र त्यास अजूनही संरक्षण मंत्रालयाची मंजुरी मिळालेली नाही.

त्यामुळे आणखी काही दिवस तरी त्या विमानाचा मुक्काम ‘पार्किंग बे’वरच असणार आहे. त्यामुळे विमानांचे वेळापत्रक विस्कळीत होणार आहे.