Pune Airport  Tendernama
पुणे

Pune Airport New Terminal : पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलला अद्याप इंटरनॅशनल उड्डाणे नाहीतच; काय आहे कारण?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवरून (Pune Airport New Terminal) देशांतर्गत उड्डाणाला १४ जुलैपासून सुरुवात झाली. जुलैअखेर सर्व देशांतर्गत उड्डाणांसह आंतरराष्ट्रीय उड्डाण देखील नवीन टर्मिनलवरून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र इमिग्रेशन विभागाकडून सेवेला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झालेली नाहीत.

आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू न झाल्याने पूर्ण क्षमतेने देशांतर्गत उड्डाण नवीन टर्मिनलवरून अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना जुन्याच टर्मिनलमधून प्रवास करावा लागत आहे.

विमानतळ प्रशासनाने नवीन टर्मिनलवरून प्रवासी सेवेसाठी केवळ तीन विमान कंपन्यांना परवानगी दिली आहे. यात एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस व इंडिगोचा समावेश आहे. पुणे विमानतळावरून इंडिगोचे दिवसभरात सुमारे ५० विमानांचे उड्डाण आहेत. त्यापैकी केवळ दिल्ली साठी रात्री ११ ते सकाळी सहा या दरम्यान पाच उड्डाणे व पाच लँडिंग नवीन टर्मिनलमधून सुरू आहेत. उर्वरित ४५ उड्डाणे हे जुन्याच टर्मिनलवरून सुरू आहेत.

सध्या नवीन टर्मिनलवरून केवळ २२ विमानांचे उड्डाण होत आहे. दिवसभरात ४४ विमानांची वाहतूक होत आहे. तर जुन्या टर्मिनलवरून १३० ते १३५ विमानांची दैनंदिन वाहतूक होत आहे.

नऊ ऑगस्टपासून एअर अकासा

विमानतळ प्रशासनाने एअर अकासाला नवीन टर्मिनलवरून सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. नऊ ऑगस्टपासून अकासाची पूर्ण वाहतूक सुरू होईल. अकासानंतर विस्तारा, स्पाईसजेट सह अन्य विमान कंपन्यांची सेवा सुरू होईल. त्यामुळे महिन्याअखेरीस सर्व विमान कंपन्या नवीन टर्मिनलवरून सेवा सुरू करतील.

‘इमिग्रेशन’चा आक्षेप केला दूर

नवीन टर्मिनलवर सीमाशुल्क व इमिग्रेशनसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. सुरुवातीला इमिग्रेशन विभागाने जागेवर आक्षेप नोंदविला होता. विमानतळ प्रशासनाने तो आक्षेप देखील दूर केला. मात्र इमिग्रेशनच्या मुख्यालयाने अद्याप नवीन टर्मिनलवर काम करण्यास मंजुरी दिलेली नाही. त्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय उड्डाण व लँडिंगवर झाला आहे. इमिग्रेशनने मंजुरी दिल्यावरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होतील.

‘इमिग्रेशन’च्या दिल्ली येथील मुख्यालयाकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवीन टर्मिनलवरून सुरू करता येणार नाही.

- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे