Pune Airport New Terminal Tendernama
पुणे

Pune Airport New Terminal : PM मोदींनी उद्घाटन केलेल्या नव्या टर्मिनलवरून अखेर 4 महिन्यांनी झाले पहिले उड्डाण

टेंडरनामा ब्युरो

Pune Airport New Terminal News पुणे : पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल (न्यू इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंग-एनआयटीबी) खुले होण्याची प्रवाशांची प्रतीक्षा अखेर रविवारी संपली. उद्घाटनाला चार महिने उलटल्यानंतर टर्मिनल कार्यान्वित झाले. (PM Narendra Modi, Muralidhar Mohol News)

यावेळी नवे टर्मिनलला फुगे व गुलाबपुष्पांनी सजविण्यात आले होते. प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पहिल्या विमानाचे उड्डाण सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाले. लेफ्टनंट कर्नल मनीषा डबास या पहिल्या प्रवासी होत्या.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिकात्मक बोर्डिंग पास देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अन्य प्रवासी दाखल होण्यास सुरवात झाली. निर्गमनमधून (डी १) प्रवाशांना आत सोडण्यात येत होते. प्रवाशांच्या स्वागतासाठी हे प्रवेशद्वार सजविण्यात आले होते.

या वेळी विमानतळावर खासदार मेधा कुलकर्णी, विमानतळ संचालक संतोष ढोके, पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे विमानतळाचे सरव्यवस्थापक एस. दत्ता, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) कमांडर संतोष सुमन आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुमारे ४७५ कोटी रुपये खर्चून ५२ हजार चौरस मीटर क्षेत्रफळात नव्या टर्मिनलची दिमाखदार वास्तू उभारण्यात आली आहे. यामुळे पुण्याची पुढील दहा वर्षांची गरज भागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ मार्चला या नव्या टर्मिनलचे उद््घाटन झाले होते.

पहिले उड्डाण :
पुणे ते दिल्ली (एआय -८५८)
वेळ : सायंकाळी ५ वाजता
प्रवासी : १८४
बे क्रमांक : ३

पहिला दिवस :
- एअर इंडिया व एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांची वाहतूक
- ९ विमानांची उड्डाणे, ९ विमानांचे लँडिंग
- सोमवारपासून १६ विमानांची उड्डाणे, १६ विमानांचे लँडिंग

असे आहे टर्मिनल :
क्युट चेक इन काउंटर : ३४
आगमन गेट : ३
निर्गमन गेट : ३
बॅगेज बेल्ट : ५
एरोब्रिज : ५
प्रवासी क्षमता : वर्षाला १ कोटी
तासाला : १८००
पुण्याशी जोडले : ३७ शहरे

आगमन झालेल्या प्रवाशांसाठी
टर्मिनलहून एरोमॉलपर्यंत जाण्यासाठी दोन बस, चार गोल्फ कार्ट : ४

नवीन टर्मिनल सुरू होणे ही प्रवाशांसाठी आनंदाची बाब आहे. नवे टर्मिनल पुणे व महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे आहे. संस्कृती व आधुनिकता याचा येथे संगम झालेला आहे. पूर्वीच्या तुलनेत नवे टर्मिनल मोठे आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होईल. येथून वर्षभरात एक कोटी प्रवासी प्रवास करतील.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री