पुणे (Pune) : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवर इमिग्रेशनसाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता केली, मात्र पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र विश्रामकक्षासह इतर काही सुविधा उभारण्याची सूचना इमिग्रेशन विभागाने केली आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. यादृष्टीने पूर्तता झाल्यानंतरच नव्या टर्मिनलवरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु होतील.
नवे टर्मिनल तयार होऊन पाच महिने उलटले आहेत. सध्या सिंगापूर व दुबई अशी दोनच आंतरराष्ट्रीय उड्डाणे जुन्या टर्मिनलवरून होत आहेत. प्रवासी संख्याही मर्यादित आहे. नव्या सूचना आल्यानंतर विमानतळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांशी थोडे खटकेही उडाले.
नव्या टर्मिनलवर इमिग्रेशन आणि डिजियात्रा या सुविधा सुरु झालेल्या नाहीत. इमिग्रेशनची सुविधा सुरु होण्यासाठी केंद्रीय नागरी वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही प्रयत्न केले, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. दुसरीकडे विमानतळ प्रशासनाने गृह मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. इमिग्रेशन विभाग मात्र सूचनांवर ठाम आहे. त्यामुळे नव्या टर्मिनलवर स्थलांतर करण्यास नकार दिला जात आहे. यामुळे प्रवाशांचे मात्र नुकसान होत आहे.
इमिग्रेशन विभागाच्या सूचनेनुसार नव्या टर्मिनलवर स्वतंत्र विभाग (डेस्क) तयार करण्यात आला आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक जागा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. अन्य सूचनांवरही काम झाले आहे. असे असूनही इमिग्रेशन विभागाचा प्रतिसाद सकारात्मक नसल्याचे विमानतळ प्रशासनाचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू न झाल्याने सीमाशुल्क विभागाला काम सुरु करता आलेले नाही.
नवे टर्मिनल कार्यान्वित होऊन पाच महिने उलटूनही डिजियात्राची सुविधा सुरू झालेली नाही. ‘बिकास’च्या अधिकाऱ्यांनी (ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी) नव्या टर्मिनलवरील चारही प्रवेशद्वारांची पाहणी केली.
मुंबईतील तज्ज्ञांच्या पथकाने याचा अहवाल दिल्लीतील मुख्यालयाला सादर केला आहे. मात्र त्यास मंजुरी मिळालेली नाही. परिणामी डिजियात्राची रखडली आहे. नव्या टर्मिनलवरुन रोज सुमारे ६० उड्डाणे होतात. एकूण १२० विमानांची वाहतूक होते. प्रवाशांकडे डिजियात्रा अॅप असूनही सेवाच सुरु न झाल्याने त्यांना ‘चेक इन काउंटर’वर रांगेत थांबावे लागते. यात त्यांचा वेळ वाया जातो.
नवीन टर्मिनलवर इमिग्रेशन व डिजियात्रा या सुविधा सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, मात्र अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी मिळाल्यानंतरच या सुविधांचा लाभ प्रवाशांना घेता येईल.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे