Pune Airport Tendernama
पुणे

Pune Airport : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर अशी बुक करा Ola, Uber

टेंडरनामा ब्युरो

Pune Airport News : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर कॅबला ‘पिकअप’साठी परवानगी नाही. मात्र प्रवासी जर दिव्यांग, गर्भवती, एकटी महिला अथवा ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना घेण्यासाठी कॅबला विमानतळ प्रशासनाने परवानगी दिली आहे. आता हीच सेवा प्रवाशांना मोबाईल ॲपवर देखील उपलब्ध होणार आहे.

एरोमॉल प्रशासनाने या संदर्भात कॅबची सेवा देणाऱ्या कंपनीशी बोलणी केली आहे. लवकरच संबंधित कंपनी आपल्या यंत्रणेत आवश्यक तो बदल करणार असून लवकरच प्रवाशांना कॅब आरक्षित करतानाच त्यांना पिकअपचा पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

टर्मिनलच्या आवारात वाहनांची गर्दी होऊन त्याचा त्रास प्रवाशांना होऊ नये याकरिता विमानतळ प्रशासनाने जुन्या व नवीन टर्मिनलवर कॅबला पिकअपसाठी मज्जाव केला आहे. त्याचा फटका ज्येष्ठ तसेच दिव्यांग प्रवाशांना बसत असल्याने विमानतळ प्रशासनाने यातून गर्भवती, एकटी महिला, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांना वगळले आहे.

काही दिवसांपूर्वीच यांना घेण्यासाठी येणाऱ्या कॅबला परवानगी दिली. मात्र त्यासाठी त्यांना नवीन टर्मिनलवरच्या उपलब्ध असलेल्या काउंटरवर जावे लागत होते. आता प्रवाशांना ॲपवरच पिकअपची सेवा उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांना काऊंटरवर जावे लागणार नाही.

विमानतळ प्रशासनाने नवीन टर्मिनलवर दोन ई बस उपलब्ध केल्या आहेत. यातून टी २ ते एरोमॉल येथे प्रवाशांना मोफत नेण्यात येते. एरोमॉलमधून प्रवाशांना कॅब उपलब्ध होते.

दोन्ही बसच्या माध्यमातून रोज सुमारे ३ हजार प्रवाशांची वाहतूक होते. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी ९ गोल्फ कार्टसुद्धा उपलब्ध आहेत. यातून देखील काही प्रवाशांची वाहतूक केली जाते.

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच गर्भवती यांच्या सोयीसाठी कॅबला पिकअपसाठी परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी त्यांना काऊंटरवर येऊन माहिती देणे अनिवार्य होते. आता अशा प्रवाशांना मोबाईलवरच कॅब आरक्षित करताना पिकअपचा पर्याय दिला जाणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनी ॲपमध्ये आवश्यक ते बदल करीत आहे. लवकरच ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होईल.

- व्ही. रजपूत, उपाध्यक्ष, एरोमॉल, पुणे विमानतळ

एरोमॉल दृष्टीक्षेपात

१२००० : कॅबची ये-जा (दैनंदिन)

९ हजार : प्रवासी वाहतूक (दैनंदिन)

३० टक्के : प्रवाशांकडून पिन सेवेचा वापर