पुणे (Pune) : पुणे शहरातील रस्त्यांची कामे करताना कंत्राटदारांनी (Contractor) रस्त्यांवरील पावसाळी गटारांकडे काणाडोळा केला, तर महापालिकेच्या (PMC) अधिकाऱ्यांनी देखील त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही, त्यांनीही दुर्लक्ष केले. त्यामुळे पहिल्या पावसात शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी तळी साचली, असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी केला.
रविवारी झालेल्या पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अनेक रस्ते खराब झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साठून वाहनचालक, पादचाऱ्यांची गैरसोय झाली होती. या पार्श्वभूमीवर वेलणकर यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली.
वेलणकर म्हणाले की, महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळी गटारे उभारली. मात्र, रस्त्यांवर डांबरीकरण करताना, दुरुस्ती करताना त्यांचा उतार या पावसाळी गटारांच्या मेनहोलकडे असेल, याची दक्षता घ्यावी लागते. परंतु कंत्राटदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे पहिल्या पावसात पुणे शहरात पाणी साठले. याला जबाबदार असणारे कंत्राटदार, महापालिकेचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी
पहिल्या पावसानंतर शहरात ठिकठिकाणी पाणी साठण्याच्या घटना घडल्या. त्याची मंगळवारी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे व डॉ. कुणाल खेमनार यांनी विविध ठिकाणी फिरून पाहणी केली. मध्यवर्ती पेठांचा परिसर, बिबवेवाडी, गंगाधाम परिसर, सातारा रस्त्याचा काही भाग, बाणेर रस्ता व सेनापती बापट रस्ता या ठिकाणी त्यांनी पाहणी केली.
काही ठिकाणी रस्त्यांची स्थिती खराब आहे. तिथे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे डॉ. खेमनार यांनी सांगितले.