Navale Bridge Tendernama
पुणे

Accident Zone: गडकरीजी, 70 बळी जाऊनही NHAIला जाग येईना?

Katraj New Tunnel To Navale Bridge मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यान (Katraj New Tunnel To Navale Bridge) मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी भीषण अपघातात ४७ गाड्यांचे नुकसान झाले होते. त्यानंतरही अपघातांची मालिका थांबलेली नाही. मात्र एवढे बळी जाऊनही रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) जाग आलेली दिसत नाही.

कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यान वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला, तसेच शेकडो वाहनांचे नुकसान झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी नऱ्हे गाव परिसरातील सेवा रस्त्याचे अतिक्रमण काढून नऊ मीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) ताब्यात घेतला. मात्र, त्यावर डांबरीकरण न केल्याने सेवा रस्त्याचा वापर करता येत नाही. जे काम आठ दिवसांत होणे अपेक्षित होते, ते दोन महिने उलटून गेले तरी होईना. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांना वाहतूक कोंडी व अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

दोन महिन्यांपूर्वी सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे काढल्यानंतर बाजूला असणाऱ्या अनेक व्यावसायिकांनी पुन्हा या परिसरात सिमेंटचे ओटे, कठडे बांधले आहेत. त्यामुळे प्रशासनावर पुन्हा अतिक्रमण काढण्याची वेळ येते की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच सेवा रस्ता अपूर्ण असल्यामुळे स्थानिक रहिवाशांना नाइलाजास्तव महामार्गावरून वाहने चालवावी लागत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

दरम्यान, सेवा रस्त्याच्या दुतर्फा असणारे अतिक्रमण व बेशिस्त वाहनचालक हे प्रामुख्याने अपघातांना जबाबदार ठरत आहेत. सेवा रस्त्याच्या दुतर्फा टपऱ्या, दुकाने, पार्किंग तसेच मोठ्या प्रमाणात होर्डिंग उभारण्यात आली आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी पंक्चरची दुकाने असल्याने अनेक वाहनचालक उलट्या दिशेने ये-जा करतात. त्यामुळेही अपघात होत आहे.

अपघातांची मालिका कधी थांबणार?
मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाहतुकीसाठी धोकादायक ठरणाऱ्या कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल, वडगाव पूल या महामार्गाभोवती मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्यातच या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. दक्षिणेकडील अनेक राज्यांतील अवजड वाहने मुंबईकडे आपापल्या राज्यातील माल वाहतूक करतात. परिणामी, २४ तास या महामार्गावर वाहतूक सुरू असते.

दोन महिन्यांपूर्वी भीषण अपघातात ४७ गाड्यांचे नुकसान झाले होते. त्यानंतरही याच भागात अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे अपघातांची मालिका कधी थांबणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

कात्रज नवीन बोगदा ते वडगाव पूल
(२०१४-२०२२ मधील स्थिती)

७० - नागरिकांचे मृत्यू

१७५ - अपघातांत जखमी

१९५ - एकूण अपघात

१३० - वाहनांचे नुकसान

अपघातांची प्रमुख कारणे
१) तीव्र उतारामुळे अवजड वाहनांना अचानक ब्रेक लागणे कठीण
२) काही ठिकाणी सेवा रस्ते नसल्याने स्थानिक वाहनचालकांना राष्ट्रीय महामार्गावरून करावा लागतो प्रवास
३) अवजड वाहनांचे चालक इंधन वाचवण्यासाठी उतारावरून वाहने न्यूट्रल करत असल्याने वाहनांवरील ताबा सुटतो

काय आहेत उपाययोजना
१) राष्ट्रीय महामार्गावरील उताराची तीव्रता कमी करणे
२) नवले पूल ते वडगाव पुलादरम्यानचे सेवा रस्त्यांचे काम करणे
३) वारजे पूल ते वडगाव पुलादरम्यान सेवा रस्ता लवकर पूर्ण करणे गरजेचे
४) सेवा रस्त्यावरून परिसरातील रहिवाशांच्या वाहनांची वाहतूक होईल, याकडे लक्ष देणे

संबंधित सेवा रस्त्यावर अतिरिक्त साडेतीन मीटर रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव मुंबई मुख्यालयाकडे पाठवला आहे. ड्रेनेज, गॅस लाईन, टेलिफोन लाईन सेवा रस्त्यावर मधोमध येत असून, त्या स्थलांतर करण्यासाठी संबंधित आस्थापनांना पत्रव्यवहार केला आहे.
- भारत तोडकरी, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

जुजबी उपयोजना करून संबंधित प्रशासन वाहनचालक व नागरिकांची फसवणूक करत आहे. अपघात झाले की लोकप्रतिनिधी आणि अधिकारी घटनास्थळी भेट देतात. परंतु ठोस उपाययोजनांकडे दुर्लक्ष करून काम झाले आहे की नाही, हे पाहण्यासाठी फिरकत देखील नाहीत.
- राजेश बोबडे, स्थानिक रहिवासी

नवले पूल परिसरात होणाऱ्या अपघातासंबंधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पुणे महापालिकेला गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. यात मात्र सर्वसामान्य नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत. संबंधित विभागाने तातडीने लक्ष न दिल्यास नागरिक रस्त्यावर येऊन आंदोलन करतील, याची वाट पाहू नका.
- भूपेंद्र मोरे, स्थानिक रहिवासी