Pune Flood Tendernama
पुणे

Pune : 'नदी सुधार'साठी 650 कोटी, मग पुण्यातील नागरी सुविधांसाठी निधी का नाही?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुण्यात आलेल्या पुराचा फटका नागरिकांना बसला. यात जलसंपदा आणि महापालिकेत (PMC) समन्वय नाही असे सत्ताधारीच हताश होऊन बोलत असतील तर ही शोकांतिका आहे. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) हे पुण्याचे महापौर राहिलेले आहेत. पुण्याबाबत ते असे हताश होऊन बोलत असतील तर ही बाब दुर्दैवी आहे, अशी टीका आमदार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या शनिवार (ता. ३) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत अहिर बोलत होते. यावेळी राज्याचे माजी मंत्री शशिकांत सुतार, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक, उपनेत्या सुषमा अंधारे, मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आदी उपस्थित होते.

अहिर म्हणाले, या अर्थसंकल्पात नदी सुधार योजनेसाठी साडे सहाशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे. परंतु, पुण्यातील नागरी सुविधांसाठी कोणताही निधी देण्यात आलेला नाही. पुण्याचे पालकमंत्री हे अर्थमंत्री सुद्धा आहेत. अर्थ खात्यामध्ये पैसे आहेत की नाहीत हे स्पष्टीकरण त्यांना द्यावे लागते. बहिणींना रक्षाबंधनपर्यंतच पैसे देता येतील पुढचे माहिती नाही, अशी परिस्थिती यावी हे दुर्दैवी आहे, असा टोला अहिर यांनी लगावला.