Pune Railway Station Tendernama
पुणे

Pune: रेल्वेकडून पुन्हा तारीख पे तारीख! पुणेकरांना फक्त आश्वासनेच

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे रेल्वे स्थानकाच्या 'यार्ड रिमॉडेलिंग'च्या कामास वारंवार 'खो' मिळत आहे. कधी बांधकाम विभागाला वेळ नाही, तर कधी पावसाचे कारण पुढे करून काम पुढे ढकलले जाते. आता रेल्वे प्रशासनाने डीसीएन (विभागीय परिपत्रक सूचना) तयार झाली नसल्याचे म्हटले आहे. वास्तविक गेल्या सहा महिन्यांत 'डीसीएन' तयार करण्याचे काम सुरूच आहे. (Pune Railway Station)

या दरम्यान मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक, पुणे विभागाचे डीआरएम (विभागीय रेल्वे व्यवस्थापक) बदलले. मात्र यार्ड रिमोल्डिंगच्या कामाला काही केल्या सुरवात झालेली नाही. याचा थेट परिणाम प्रवासी रेल्वे गाड्यांवर व पर्यायाने सेवेवर होत आहे. हे काम गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे.

रेल्वेचा बांधकाम विभाग हे काम करणार आहे. सुरवातीला २४९ दिवसांची ‘डीसीएन' तयार करण्यात आली. मात्र कालावधी जास्त असल्याने त्यास विरोध झाला. त्यानंतर कालावधी कमी करण्याचे नियोजन झाले. यालाही दोन महिन्यांचा अवधी उलटून गेला. मात्र ‘डीसीएन' तयार होऊन रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात आलेली नाही. त्यामुळे कामास सुरवातच झालेली नाही.

ट्रीप शेड व तिसरी, चौथी मार्गिका
पुणे स्थानकावर मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डात सध्या ट्रीप शेड आहे. तेथे विद्युत इंजिनांची पाहणी केली जाते. ट्रीप शेडचे स्थलांतर केले जाणार आहे. शिवाय पुणे-लोणावळा दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गिकांचे कामही प्रस्तावित आहे. त्यामुळे 'यार्ड रिमॉडेलिंग'चे काम सुरू करताना या दोन्ही बाबी विचारात घेतल्या जातील. त्यामुळे हे काम कधी सुरू होणार हे अनिश्चितच आहे.

विभागीय परिपत्रक सूचना 'डीसीएन' प्राप्त झाल्याशिवाय 'यार्ड रिमॉडेलिंग'च्या कामाला सुरवात होणार नाही. बांधकाम विभागाकडून 'डीसीएन' अद्याप मिळालेली नाही. ट्रीप शेडच्या कामांचा यावर परिणाम होणार नाही.
- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे