Pune Traffic Tendernama
पुणे

Pune: अवघ्या ३ मिनिटांच्या अंतरासाठी करावा लागतोय तासाभराचा प्रवास

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : हडपसरहून शिवाजीनगर मार्गे पाषाणकडे जात असताना गणेशखिंड रस्त्यावरील सिमला ऑफिस चौकातील वाहतूक कोंडीत अडकलो. जवळपास एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चारचाकीचा फक्त पहिला आणि दुसराच गिअर टाकू शकलो. अक्षरशः पायाला गोळे आले होते. नियमीत या रस्त्यावरून जावे लागते, रोज तास-दीड तास वाहतूक कोंडीत जात असल्याने इच्छितस्थळी वेळेवर पोहोचू शकत नाही, ही व्यथा आहे नियमित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून प्रवास करणारे पाषाण येथील रहिवासी भारत निम्हण यांची.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात महामेट्रो व उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. वर्दळ असलेल्या या रस्त्यावर नियमीत येणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या व्यथा मांडल्या.
औंध येथील प्रवासी संतोष नखाते म्हणाले, ‘‘विद्यापीठ चौकातून औंधला येण्यासाठी जवळपास पाऊण तास लागला. म्हसोबा गेट रस्त्यावर रात्री अकरा वाजतादेखील वाहतूक कोंडी असते. गणेशखिंड ते औंध रस्ता नियमीत सुरू करायला हवा. काळेवाडी, सांगवी या भागाकडे वाहनधारकांना जायचे असेल तर लक्षात येत नाही. त्यामुळे दिशादर्शक, सूचना फलक जागोजागी लावणे गरजेचे आहे.

औंध रस्ता बंद करून पाषाणकडे वाहतूक सुरू केली होती, ती काल सायंकाळी चार वाजल्यापासून खुली करण्यात आली आहे. म्हणजे, औंध रस्त्यावरून वाहतूक सोडण्यात आली आहे. गणेशखिंड आणि सेनापती बापट रस्ता येथून येणारी वाहने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात एकत्र येतात. तेथे बॉटल नेक तयार होत असल्यामुळे गणेशखिंड रस्त्यावर ई-स्क्वेअरपर्यंत वाहतूक कोंडी होते.
- बाबासाहेब कोळी, पोलिस निरीक्षक, चतुःश्रृंगी वाहतूक विभाग