PMC Tendernama
पुणे

Pune : पुणे महापालिकेतील 'त्या' अधिकाऱ्यांचे का दणाणले धाबे?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील धार्मिक सण, मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना मोठी गर्दी होते. नागरिकांच्या सोईसाठी फिरत्या स्वच्छतागृहांच्या (मोबाईल टॉयलेट) मागणीनुसार तेथे व्यवस्था केली जाते. त्यासाठीचे १८ लाख ६४ हजार रुपयांचे बिल स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहे. मात्र, कार्यक्रमाच्या दिवसांपेक्षा जास्त दिवसाचे बिल लावणे, मागणी नसताना प्रतिदिन २५ हजार रुपये भाडे असणारे व्हीआयपी टॉयलेटचे बिल सादर करणे, असा प्रकार समोर आला आहे. यावरून घनकचरा विभागाकडे चौकशी सुरू केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, उलट तपासणी केल्याशिवाय पैसे देणार नाही, अशी सारवासारव केली आहे.

महापालिकेकडून शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली जाते. याशिवाय पालखी, गणेशोत्सव, मेळावे, बचत गटाचे कार्यक्रम, धार्मिक उत्सवांसह मिरवणुकांमध्येही ही सुविधा दिली जाते. त्यासाठी प्रतिदिन ११०० रुपये भाडे महापालिका ठेकेदाराला देते. घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्थायी समितीसमोर गेल्या वर्षभरातील मोबाईल टॉयलेटच्या वापराचे बिल सादर केले असून, त्यास मान्यता घेतली जाणार आहे. यामध्ये दिवाळी बचत बाजार, पुस्तक महोत्सव आदी ठिकाणी व्हीआयपी टॉयलेटची व्यवस्था केली होती, असे त्यात दाखविण्यात आले आहे.

महापालिकेने दिवाळीत तीन ठिकाणी बचत बाजाराचे आयोजन केले होते. या तिन्ही कार्यक्रमांच्या ठिकाणी प्रत्येकी ७ दिवस २ व्हीआयपी टॉयलेट उपलब्ध करून दिले. पुणे पुस्तक महोत्सवात स.प. महाविद्यालय मैदानावर २ दिवस आणि फर्ग्युसन महाविद्यालय मैदानावर १० दिवस टॉयलेट उपलब्ध करून दिले आहेत.

यात सर्वाधिक वापर महापालिकेच्या दिवाळी बचत बाजाराला झालेला असल्याने याबाबत समाज विकास विभागाकडे चौकशी केली असता, कात्रज आणि सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानातील बचत बाजारासाठी व्हीआयपी टॉयलेटची मागणी केलेली नव्हती, तर बाणेरमधील बाजारात दोन टॉयलेट ठेवले होते, असे सांगण्यात आले, तर या तिन्ही ठिकाणी प्रत्येकी २० साधे मोबाईल टॉयलेट ठेवल्याचे बिल स्थायी पुढे आले आहे.

प्रत्यक्षात कात्रज येथे पाच महिलांचे आणि पाच पुरुषांचे स्वच्छतागृह ठेवण्यात आले होते, तर देशपांडे उद्यानात मोबाईल टॉयलेट ठेवलेच नव्हते, असे समाज विकास विभागातील सूत्रांनी सांगितले.

मोबाईल टॉयलेटच्या वापराचे बिल स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहे, पण त्याबद्दल तक्रारी आल्याने योग्य ती खातरजमा करूनच याचे योग्य ते बिल दिले जाईल.

- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा विभाग

दिवाळी बचत बाजारासाठी मोबाईल टॉयलेटची मागणी केली होती, पण त्यांची संख्या किती होती, याची माहिती काढण्यास सांगितले आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

- नितीन उदास, उपायुक्त, समाज विकास विभाग, पुणे महापालिका

मोबाईल टॉयलेट

प्रतिदिन भाडे ११००

नग १२४०

बिल १३.६४ लाख

व्हीआयपी टॉयलेट

प्रतिदिन भाडे २५०००

नग २०

बिल ५ लाख