पुणे (Pune) : पावसाळ्यात खडकवासला धरण (Khadakwasla Dam) प्रकल्पातून पुण्याला अशुद्ध पाणीपुरवठा होतो, अशा वेळी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेकडून तुरटी, पॉली ॲल्युमिनियम क्लोराइड (पीएसी) टाकून पाणी शुद्ध केले जाते. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाने सुमारे १० कोटी रुपयांची तुरटी व पीएसी खरेदीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पावसाळ्यात नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
शहराच्या बहुतांश भागाला खडकवासला धरण प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो, तर खराडी व परिसरात भामा आसखेड धरणातून पुरवठा केला जातो. पावसाळ्यात धरणात पाण्याबरोबर माती वाहून येण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पाण्याची गढूळता वाढते. सामान्य स्थितीत धरणातील पाण्याची गढूळता (टर्बिडिटी) ५ निफोल टर्बिडियी युनिट (एनटीयू) असते. पण पावसाळ्यात हे प्रमाण २०० पेक्षा जास्त होते.
त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी निर्जंतुकीकरण करताना पाण्यात ‘पीएसी’ (पॉलि ॲल्युमिनिअम क्लोराइड) टाकले जाते. त्यामुळे पाण्याची गढूळता ही ५ एनटीयूपेक्षा कमी करता येते, तर सप्टेंबर महिन्यानंतर धरणातील पाण्याची गढूळता कमी होते, त्या वेळी तुरटीचा वापर केला जातो.
पाणीपुरवठा विभागाने या दोन्ही प्रकारची औषधे खरेदी करण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. यात पावसाळ्यासाठी ३ हजार ६६१ टन ‘पीएसी’ खरेदी केले जाणार असून, यासाठी ३ कोटी ९५ लाख रुपयांच्या टेंडरचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. पाच हजार ८०० टन तुरटी खरेदी केली जाणार आहे. त्यासाठीच्या ५ कोटी ९३ लाख रुपयांच्या खरेदीस पूर्वगणनपत्रक समितीने (इस्टिमेट कमिटी) मान्यता दिली. त्यामुळे आता याची टेंडर होणार आहे.
पावसाळ्यात गढूळ पाणी येऊ नये, यासाठी पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यासाठी तुरटी, पीएसी खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेकडून काळजी घेतली जात आहेच; नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग