Collector Of Pune Tendernama
पुणे

Pune : 'हे' टेंडर मर्जीतील ठेकेदारांना मिळण्यासाठी वजनदार राजकारण्यांचा खटाटोप

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : आंबिल ओढ्याला आलेल्या पुरानंतर राज्य सरकारने नाल्यांना सीमाभिंत बांधण्यासाठी पुणे महापालिकेला २०० कोटी रुपयांचा निधी दिली आहे. राज्य सरकारच्या आदेशात ८८ कामांचा उल्लेख व निधीची तरतूद दाखविण्यात आली आहे. पण महापालिका प्रशासनाने ८८ कामांच्या पाच टेंडर काढताना या प्रत्येक ठिकाणचे इस्टिमेट जोडलेले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यावर हरकत घेतली आहे. त्यातच कोट्यवधी रुपयांचे हे टेंडर मर्जीतील ठेकेदारांना मिळाव्यात, यासाठी शहरातील वजनदार राजकारण्यांचा खटाटोप सुरू झाला आहे.

पुण्यात २५ सप्टेंबर २०१९ला ढगफुटी होऊन आंबिल ओढ्याला पूर आला. वस्त्या, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, अनेक सोसायट्यांच्‍या सीमा भिंती पडल्या, २०पेक्षा अधिक जणांचा यामध्ये बळी गेला होता. त्यानंतर महापालिकेने आंबिल ओढ्याच्या दोन्ही बाजूंनी संरक्षण भिंती, नवीन पूल बांधले, पण काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे काम करता आले नाही. त्यामुळे राज्य सरकारने या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मार्च महिन्यात मंजूर केला. राज्य सरकारने यानंतर ३० जुलै रोजी स्वतंत्र आदेश काढत या निधीचे वितरण करण्यास मान्यता दिली. त्यासाठी शहरात कोणकोणत्या भागात सीमाभिंत बांधल्या जाणार आहेत, याचा स्पष्ट उल्लेख करून, त्यासमोर खर्चाची तरतूद केली आहे. त्यामुळे टेंडर काढताना प्रत्येक ठिकाणच्या कामाचे इस्टिमेट जोडणे आवश्‍यक होते. मात्र, महापालिका प्रशासनाने ८८ कामांची पाच विधानसभा मतदारसंघात विभागणी करताना इस्टिमेट जोडले नाही. पर्वती, कोथरूड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर या पाच विधानसभा मतदारसंघनिहाय टेंडर काढले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर हरकत घेत, शासनाच्या आदेशात ज्या पद्धतीने कामे सुचविण्यात आली आहेत तसे टेंडर काढाव्यात, असे महापालिकेला सांगण्यात आले.

त्यानंतर हे टेंडर रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर मुंबई आणि दिल्लीतून सूत्र फिरल्यानंतर हे टेंडर कायम ठेवण्यात आले आहेत. पाचही विधानसभा मतदारसंघांत काम करण्यासाठी ठेकेदारांचे टेंडर दाखल झाले आहेत, पण या कामांचे टेंडर भरून स्पर्धा वाढू नये, यासाठीही ‘माननियां’चे कामकाज पाहणाऱ्या कार्यकर्त्यांकडून ठेकेदारांना फोन गेले आहेत, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

या भागात बांधल्या जाणार सीमाभिंत

वानवडी सोसायटी, भैरोबा नाला, सोपानबाग, बी. टी. कवडे रस्ता, कोरेगाव पार्क, वानवडी गावठाण, निलम पार्क ते बागूल उद्यान, सिंहगड रस्ता, पद्मावती, कटारिया हायस्कूल, के. के. मार्केट ते गुरुराज सोसायटी, मंत्रीपार्क, तेजस सोसायटी, शास्त्रीनगर, डहाणूकर कॉलनी व परिसरातील भाग, बालाजीनगर, बिबवेवाडीतील आंबिल ओढा, मानाजीनगर नऱ्हे, वारजे, भुसारी कॉलनी, बावधन, कुंबरे पार्क एकलव्य कॉलेज, पॉप्युलर नगर, सिप्ला रुग्णालय वारजे, सावित्री गार्डन ते चव्हाण बाग, काळूबाई मंदिर, अंबाई माता मंदिर धायरी, इंदिरा शंकर सोसायटी, आदित्य गार्डन, औंध आयटीआय, सिंध सोसायटी, मंत्री रिव्हेरा सोसायटी बोपोडी, निलज्योती म्हाडा कॉलनी यासह ८८ ठिकाणांचा समावेश आहे.

‘‘राज्य शासनाकडून नाल्यांना सीमाभिंत बांधण्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी आला आहे. त्यासाठी पाच विधानसभा मतदारसंघनिहाय टेंडर काढण्यात आले आहे. या आदेशात ८८ ठिकाणे आणि त्यांची तरतूद दिलेली आहे. त्यामुळे त्याचे इस्टिमेट जोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले होते. त्यानुसार सुधारणा करून जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी फाइल पाठवली जाणार आहे. त्यांच्या मान्यतेनंतरच ‘अ’ पाकिट उघडले जातील.

- संतोष तांदळे, अधिक्षक अभियंता, मलनिःसारण विभाग

विधानसभानिहाय टेंडर रक्कम आणि ठेकेदारांचे आलेले प्रस्ताव

खडकवासला - ४१.२३ कोटी - ९

शिवाजीनगर - २४.८० कोटी - ७

कॅन्टोन्मेंट - ३९.०४ कोटी - ७

पर्वती - ४१.१५ कोटी - ४

कोथरूड - १९.९० कोटी - ९