PMRDA Tendernama
पुणे

पुण्यातील 'या' दुमजली उड्डाणपुलांसाठी PMRDAला हवेत 300 कोटी

टेंडरनामा ब्युरो

पुणे : पुणे विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल, पंतप्रधान आवास योजना, विकास आराखड्यातील रस्ते अशा विविध प्रकल्पांसाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा निधी हवा आहे. केंद्र सरकारकडून भांडवली विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या बिनव्याजी ‘विशेष साहाय्य योजने’तून तो उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ‘पीएमआरडीए’ने राज्य सरकारकडे केली आहे.

उड्डाणपुलासंदर्भात पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि राज्य सरकार यांच्या मध्यंतरी एकत्रित झालेल्या बैठकीत उड्डाणपुलासाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या पन्नास टक्के खर्च महापालिकेने उचलावा असे ठरले होते. त्यानुसार विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल उभारण्यासाठी सुमारे २७० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी १३५ कोटी रुपये महापालिकेने द्यावेत, याशिवाय दोन भुयारी मार्ग आणि एक ग्रेस सपरेटर बांधण्यासाठी ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे दोन्ही खर्च विचारात घेऊन ४३५ कोटी रुपये महापालिकेने द्यावेत, अशी विनंती पीएमआरडीएने महापालिकेला प्रस्ताव पाठवून केली आहे. मात्र महापालिकेने त्यास नकार दिला होता.

मध्यंतरी पुन्हा राज्य सरकारकडे झालेल्या बैठकीत हा खर्च महापालिकेनेच द्यावा, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, महापालिकेने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. याशिवाय पंतप्रधान आवाज योजनेतंर्गत घरे, प्रारूप विकास आराखड्यातील रस्ते अशा विविध प्रकल्पांचे नियोजन पीएमआरडीएने हाती घेतले आहेत. अशा सर्व प्रकल्पांसाठी पीएमआरडीएला निधीची आवश्‍यकता आहे.

अपेक्षित खर्च
- हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान ‘पीएमआरडीए’कडून मेट्रो प्रकल्पाचे काम हाती
- संपूर्ण प्रकल्प इलेव्हेटेड
- पुणे विद्यापीठ चौकातील अडथळा ठरणारा उड्डाणपूल पाडला
- सेनापती बापट रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी त्या जागी दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन
- कामासाठी सुमारे ५७० कोटी रुपये खर्च अपेक्षित

काय आहे निर्णय?
- केंद्र सरकारकडून भांडवली कामांसाठी ‘विशेष साहाय्य योजनेतंर्गत’ राज्यांना पाच हजार ५४ कोटी रुपये बिनव्याजी पन्नास वर्षांच्या दीर्घ मुदतीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय
- राज्य सरकारकडून महापालिका आणि पीएमआरडीएला पत्र पाठवून योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आव्हान
- ‘पीएमआरडीए’कडून पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलासह विविध प्रकल्पांसाठी ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव
- राज्य सरकारची मान्यता घेऊन तो केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार
- त्यास मान्यता मिळाली, तर उड्डाणपूल उभारणीसाठी निधीचा प्रश्‍न मार्गी लागणार
- पुणे महापालिकेवरील आर्थिक भार देखील कमी होण्यास मदत

काय कामे होणार?
- पुणे विद्यापीठ ते ई स्क्वेअरपर्यंत असा सव्वा किलोमीटर लांबीचा दुमजली उड्डाणपूल
- दुसऱ्या स्तरावर मेट्रोसाठी स्वतंत्र मार्गिका असणार
- बाणेरकडे जाण्यासाठी दुपदरी रॅम्प
- सेनापती बापट रस्त्यावर उड्डाणपुलावर जाण्यासाठीचा रॅम्प
- पाषाणकडे जाण्यासाठी दुपदरी रॅम्प
- बाणेरकडून शिवाजीनगरकडे, तसेच शिवाजीनगरकडून बाणेरला जाण्यासाठी दुपदरी भुयारी मार्ग
- शासकीय तंत्रनिकेतनच्या आवाराच्या समोरील बाजूस शिवाजीनगर ते औंध उड्डाणपुलावर जाण्यासाठी रॅम्प
- हरेकृष्ण मंदिर पथावर भुयारी मार्ग
- सिमला ऑफिस चौकात ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल
- बाणेर रस्त्यावर अभिमान श्री चौकात भुयारी मार्ग

पुणे विद्यापीठ येथील दुमजली उड्डाणपूल, पंतप्रधान आवास योजना, विकास आराखड्यातील रस्ते अशा विविध प्रकल्पांसाठी या वर्षी पहिल्या टप्प्यात ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पुढील वर्षी अनेक काही प्रकल्पांचा समावेश करूनही या योजनेतून निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
- डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, पीएमआरडीए