pmrda Tendernama
पुणे

Pimpri : PM आवास योजनेच्या गृह प्रकल्पातील नागरिकांच्‍या तक्रारीनंतर पीएमआरडीएला जाग

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : भोसरी येथील पेठ क्रमांक १२ मधील प्रधानमंत्री आवास योजनेच्या गृह प्रकल्पातील नागरिकांच्‍या सातत्‍याने होणाऱ्या तक्रारीनंतर पीएमआरडीए प्रशासनाला जाग आली आहे. या गृहप्रकल्‍पाची स्‍ट्रक्‍चरल तपासणी करण्याचे निर्देश आयुक्‍त योगेश म्‍हसे यांनी दिले आहेत. त्यामध्ये बांधकामात दर्जाहीन साहित्‍य वापरल्याचे आढळल्यास ठेकेदारावर फौजदारी गुन्‍हे दाखल होणार आहेत. त्‍यामुळे, ठेकेदारावर कारवाईची टांगती तलवार आहे. मात्र, कारवाई होणार का? हे पहावे लागणार आहे.

भोसरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पेठ क्रमांक १२ येथे गृहप्रकल्प एक आणि दोनमध्ये सदनिका बांधण्यात आल्या आहेत. तेथील सदनिकाधारकांनी काही दिवसांपूर्वी पीएमआरडीएकडे सदनिकेतील बाथरूम, टॉयलेट, टेरेस, सोलर वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन आदी सुविधांबाबत तक्रारी केल्‍या. ठेकेदाराकडून जलदगतीने काम होत नसल्याचे गाऱ्हाणे मांडले. या तक्रारी सातत्‍याने होत असल्‍याने संबंधित ठेकेदार, अधिकारी आणि नागरिक यांची संयुक्त बैठक आयुक्‍त योगेश म्‍हसे यांनी घेत अडचणी जाणून घेतल्या. यात गृह प्रकल्पाच्या कामातील आढळून आलेले दोष, तक्रारी तातडीने निराकरण करण्यासाठी पुढील एका महिन्यात मुदत संबंधितांना देण्यात आली.

त्रयस्थ संस्थेकडून गुणवत्तेची तपासणी

संबंधित गृहप्रकल्प कामाच्या गुणवत्तेबाबत त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करून घेत प्रमाणपत्र घ्यावे. त्यासह संबंधित ठेकेदार यांच्या कामातील संथगतीकरिता तसेच नेमून दिलेल्या कालावधीत काम पूर्ण न झाल्यास त्यांच्यावर निविदा प्रक्रियेतील अटी-शर्तीनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तसेच बांधकाम करताना निकृष्‍ट साहित्‍य वापरले असल्‍याचे निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्‍हा देखील दाखल करण्याचा इशारा आयुक्‍तांनी दिला आहे.

कोणत्या आहेत समस्‍या?

- सदनिकांमधील छतांना गळती.

- स्वच्छतागृहांचे निकृष्‍ट काम

- पाण्याचा अपुरा पुरवठा

- सोडत लवकर न झाल्‍याने सदनिका धूळखात

- टॉयलेट, टेरेस, पाणी टाकी गळती

अधिकाऱ्यांना अभय ?

गृहप्रकल्प उभारताना त्याचे काम व्यवस्थित झाले का नाही, हे पाहण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची आहे. मात्र, पाहणीकडे दुर्लक्ष केल्याने या समस्या उद्‍भवला गेल्याचे दिसून आले आहे. परिणामी, या अधिकाऱ्यांची चौकशी करणार असल्‍याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्‍यांच्‍यावर ठोस कारवाई होणार का?, असा प्रश्‍न उपस्‍थित होत आहे.

पेठ क्रमांक १२ गृहप्रकल्पामध्ये चुका आहेत. या प्रकल्पाच्या अनुषंगाने स्ट्रक्चरची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे महिनाभरामध्ये नागरिकांच्या तक्रारीचे निरसन करण्याचा प्रयत्‍न केला जाईल. बांधकाम करताना निकृष्‍ट साहित्‍याचा वापर झाला असल्‍यास पुढे संबंधित काम करणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी कारवाई करावी लागेल.

- योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए